मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली असली तरी मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांना आंदोलनासाठी अवघ्या एका दिवसाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे एक दिवसांमध्ये आंदोलन होतं का? एक दिवसाची परवानगी देत चेष्टा केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे राऊत म्हणाले. ते म्हणाले, की लोकं कबुतरासाठी आंदोलन करतात. सरकार त्यांना परवानगी देते. मग मराठी माणसाला त्यांच्या राजधानीमध्ये आंदोलन करण्यासाठी अधिकार असल्याचे ते म्हणाले. ही राजधानी कोकण, विदर्भ, मराठवाडा सगळ्यांची असल्याची ते म्हणाले. त्यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलकांना थांबवू नये अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की मराठी माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जाती जातीत तुकडे पाडण्याचे काम केले
विरोधक या विषयावर राजकारण करत नसल्याचे ते म्हणाले. राजकारण आम्ही करत नाही राजकारण जे आहे. जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या दहा वर्षात जास्त झाले तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच एकजूट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम फडणवीस यांनी केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मराठी माणसाची एकजूट मोडून फडणवीस यांनी सत्ता मिळण्यासाठी राजकारण केल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




