मुंबई । Mumbai
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातील राजकीय संघर्ष आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून राहुल नार्वेकर यांचा एक खळबळजनक व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत दोन गटांमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे. ही घटना अलिबाग येथील असून शेतजमिनीच्या मोजणीवरून हा सर्व प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संजय राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर करताना अतिशय आक्रमक कॅप्शन दिले आहे. “विधान सभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?” असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालय (PMO India) यांना देखील टॅग केले आहे. या प्रकरणाचा खुलासा नार्वेकर यांनी स्वतः करावा, अन्यथा आपण सविस्तर माहिती देऊ, असा इशारा राऊत यांनी या माध्यमातून दिला आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?
या व्हिडीओमध्ये राहुल नार्वेकर हे काही लोकांसोबत एका ठिकाणी उभे असताना दिसत आहेत. तिथे उपस्थित असलेले स्थानिक लोक, ज्यात एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे, ते नार्वेकर आणि त्यांच्या सोबतच्या लोकांवर प्रचंड संतापलेले दिसत आहेत. “आम्ही घरी नसताना तुम्ही आमच्या जागेत शिरलाच कसे? आमच्या घरात साखरपुडा असतानाही तुम्ही आला होतात आणि आताही आम्ही नसताना संधी साधून आत शिरता का?” असे प्रश्न स्थानिक महिला विचारताना दिसत आहे.
या संवादावरून हा वाद जमिनीच्या हद्दीवरून असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक लोक असा आरोप करत आहेत की, त्यांच्या मालकीच्या जागेत आणि फॉरेस्टच्या जागेत संबंधित गट बेकायदेशीरपणे शिरकाव करत आहे. यावेळी राहुल नार्वेकर हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि “भांडण करू नका” असे आवाहन दुसऱ्या गटाला करत आहेत. मात्र, स्थानिक लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून आणि वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच, राहुल नार्वेकर तिथून निघून जाताना व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीत स्थानिकांनी एका व्यक्तीला मारहाण करणे आणि विधानसभा अध्यक्षांना तिथून निघून जावे लागणे, हे प्रशासकीय दृष्टीने चर्चेचे ठरत आहे. दुसरीकडे, जमिनीच्या वादात विधानसभा अध्यक्षांचे नाव आल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. अद्याप राहुल नार्वेकर यांच्याकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा कशी करते आणि नार्वेकर यावर काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





