नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘चेक बाउन्स प्रकरणात (Cheque Bounce Case) दोन न्यायालयांनी तिसऱ्यांदा बजावलेल्या ‘अटक वॉरंट’ ला ठेंगा दाखवित पळ काढणाऱ्या ठगास म्हसरुळ पोलिसांनी (Mhasrul Police) केवळ चेहरापट्टीमुळे ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलिसांच्या बोटांचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला गजाआड करीत तुरुंगाची हवा खाऊ घातली. सुभाष दत्तात्रय राजोळे (रा. मेनरोड, पिंगळे गल्ली, मखमलाबाद) असे संशयिताचे नाव आहे.
राजोळे याच्यावर चेकबाऊन्स केल्यासंदभनि सन २०१८ पासून विविध पोलीस ठाण्यांत दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या आधीही त्याचा शोध घेतला असता, तो घरी वा कुठेही सापडला नाही. दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी पोलिसांना चकवा देत त्याने घराच्या छतावरुन उडी घेत पळ काढला होता. असे असताना, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता वरिष्ठांच्या आदेशाने घोटी पोलीस स्टेशनचे हवालदार एस. टी. खैरे व म्हसरुळचे हवालदार सोमनाथ गुंबाडे हे संशयित राजोळे याच्या अटकेसह त्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी मखमलाबाद गावात वॉरंट बजावण्यासाठी पोहोचले.
वॉरंट चिकटवून दोघेही पोलीस स्टेशनकडे (Police Station) परत येत येण्यासाठी मखमलाबाद बसस्टँवर असताना गुंबाडे यांना राजोळेची चेहरापट्टी असलेला संशयित दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणी बॉटल डिक्कीत ठेवून त्याचा पिच्छा पुरवला. त्याचवेळी संशयित राजोळे याने पळत पळत रिक्षा पकडली. रिक्षात बसून पळ काढण्याच्या तयारीतच राजोळेला गुंबाडे यांनी पकडून ‘अटक वॉरंट’ची माहिती दिली व ‘पोलीस स्टेशनला चला’ असे सांगितले.
दरम्यान, तेव्हा राजोळे याने पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बोटाचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय “परत आल्यावर तुमच्याकडे बघुन घेईन’, अशी दमदाटी केली. सध्या राजोळे अंबड पोलिसांच्या लॉकअपध्ये असून न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. तपास उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.
तेव्हाही पळाला…
राजोळे हा सराईत ठग असून त्याने अनेक व्यवहारांत फसवणुक केल्याचे आरोप आहेत. व्यवहाराबद्दल त्याने अनेकांना दिलेले धनादेश नेहमीच बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे संबंधितांनी फिर्यादी नोंदविल्या आहेत. दरम्यान, या दाखल गुन्ह्यांत तो नेहमीच पळ काढत होता. त्याच्या घरीही अनेकदा पोलिस गेले. त्याची पत्नी व मुले ‘राजोळे’ घरात नाहीत, असे सांगून मोकळे होतात, असे संबंधित पोलिसांनी सांगितले.




