मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक (Assembly Election) तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यातच आता बारामतीमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.
‘बारामतीला मी मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे,’ असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानानंतर ते निवडणूक लढवणार की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : “शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न”; जयंत पाटलांचे…
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक हरणार हे नक्की आहे, हे त्यांना सुद्धा माहीत आहे. जे तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि तुमच्या वडिलांप्रमाणे आहेत असे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिलं. परंतु तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा परिस्थितीत आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नाही, असं सांगत संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘एकच दादा अजित दादांचा’ घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा, असे अजित पवार म्हणाले.
हे देखील वाचा : अनेक वर्षांनंतर शरद पवार लालबागच्या…