मुंबई | Mumbai
जर बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून मुंबईचा मराठी महापौर होईल, असे थेट वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले होते. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एवढे वाईट दिवस आले नाहीत, म्हणत भास्कर जाधवांच्या वक्तव्याला महत्व दिले नाही.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाची मदत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टपणे उत्तर दिले. एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घ्यायचा की नाही याबद्दल पक्ष प्रमुख आणि पक्ष निर्णय घेतील. यापुढे काय करायचे हे पक्ष ठरवेल, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेनेवर इतके वाईट दिवस आलेले नाहीत. केवळ सत्तेत बसण्यासाठी आम्ही आमच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवले. आता मोदी एकनाथ शिंदेंकडून ऊर्जा प्रेरणा मार्गदर्शन घेतात का असा लोकांच्या मनात एक प्रश्न आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिले आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात. शिवसेनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात पक्ष ठेवला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला.
भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटली
खरं तर भाजपला सत्तेची राक्षसी हाव सुटली आहे आणि ते तुम्हाला दिसत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी पैशाचा वापर करून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. हा काही बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब असे म्हणायचे की, यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.




