मुंबई | Mumbai
शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हे एकत्र येण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. राजकारणात दोन पक्ष एकत्र येणे सामान्य बाब असली तरी या दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख चुलत भाऊ आहेत. या दोन्ही नेत्यांकडे मराठी माणसाचे कायमच लक्ष लागलेले असते. तसेच त्यांची विधाने राजकारणात चर्चेचा विषय ठरत असतात. असे असतानाच आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मनसे युती संदर्भात केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेची सकारात्मक भुमिका
संजय राऊत यांनी दोन्ही पक्षाच्या युतीबाबत मोठे भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी मुलाखत दिली. किंवा राज ठाकरेंनी दुसरी मुलाखत दिली. म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असेल. उद्धव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतींवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर गोड बोलतात. पण तसे नाही ना. मिठ्या मारतील. बाजूला बसतील. एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी करतील. पण प्रत्यक्षात तसे चित्र आहे का. तसे चित्र नाही. राज ठाकरे यांच्या तीन मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय चाललेय हे आम्हाला माहीत आहे. आम्ही स्वत: उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर नाते जोडायला आम्ही सकारात्मक भूमिका ठेवली आहे. कोण काय बोलते या पेक्षा ठाकरे काय बोलतात पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही, हे महत्त्वाचे आहे, असे राऊत म्हणाले.
उध्दव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भुमिका
संजय राऊत पुढे म्हणाले, मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. आमच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झालेली आहे. कालही आम्ही बोललो. आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचे अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनातील योजना, इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मागे हटता कामा नये तीच बाळासाहेबांना मानवंदना होती, असे वक्तव्य राऊतांनी केले. राज- उद्धव ठाकरे युतीची पडद्या मागची चर्चा बाहेर येईल ना. पडद्याच्या नाड्या तुमच्या हातात नाही. पडद्याच्या नाड्या कधी ओढायच्या हे दोन भाऊ ठरवतील. ठाकरे ठरवतील, असे राऊत म्हणाले.
दोघांवरती प्रेशर
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. दोघांवरती जनतेचे प्रेशर आहे, जसे भावनिक प्रेशर आहे तसे राजकीय सुद्धा आहे. मुंबईवर जर आपला अधिकार ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटर बाय अमित शाह, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि बाकी शेअर होल्डर्स यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे-पवार ब्रँड संपणार नाही
ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही. हे राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. हे जे ईस्ट इंडिया कंपनीचे मालक दिल्लीत बसलेत, गुजरातमधून गेलेले त्यांची ही भूमिका आहे की जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही, तोपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही. मुंबई गिळता येणार नाही. त्यासाठी आधी ठाकरे आणि पवारांना संपवा. नष्ट करा. वेगवेगळ्या माध्यमातून. त्यासाठीच तर त्यांचे पक्ष तोडले, त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकले. त्यांचे चिन्ह काढले. पक्ष काढले. ही त्यांची भूमिका आहे, त्यासाठीच आहे. पण ब्रँड संपला नाही. लोकं ठाकरे आणि पवारांच्या मागे आहेत, असा दावा राऊतांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा