मुंबई | Mumbai
राज्याचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाबाबत एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला एक प्रकारे पाठिंबा देणारे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. दरम्यान, वेगळ्या विदर्भाच्या मुद्यांवरून आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊ यांनी भाजपा आणि काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे.
खासदार राऊत म्हणाले, राज्याचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस त्यावर काम करत आहेत. त्याला शिवसेना शिंदे गटाचे कोणतेही नेते किंवा आमदार विरोध करयला तयार नाही. म्हणजे हे अमित शाहांचे मिंधे आहेत. सरकारच्या कॅबिनेटमधील एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहे. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे लोळागोळा होऊन बर्फाच्या लादीवर बसून आहात, याचा अर्थ अमित शाह यांचा मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याला तुमचा छुपा पाठिंबा आहे. अशी जोरदार टीका राऊत यांनी भाजपसह एकनाथ शिंदे गटावर केली आहे.
काँग्रेसने कितीही आपटली तरी विदर्भ वेगळा होणार नाही
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेची री ओढली. यावर विचारले असता, राऊतांनी या प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट उत्तर दिले आहे. ते म्हणाले आम्ही वडेट्टीवार अथवा काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा या मुद्यावरून आमचा आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसने कितीही आपटली तरी विदर्भ वेगळा होणार नाही. हे त्यांचे राजकारण आहे. आणि भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहात असेल तर त्याचं स्वप्न भंग होईल असं विधान संजय राऊत यांनी केले आहे.
सभागृहात विरोधी पक्षनेता असणे गरजेचे
“विधीमंडळातील कामकाजाचे गांभीर्य संपले आहे. सध्या सर्कस सुरू आहे. संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामुळे संसदेतील चर्चेत जान आहे. लोकशाही जिवंत असल्याचे एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील किंवा विधानसभा असेल, सभागृहात विरोधी पक्ष नेता असणे गरजेच आहे. संविधानाची देखील ती गरज आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत विरोधी पक्ष नेता कुठे ठेवायचाच नाही, त्या अनुषंगाने निकालांची मांडणी करायची, हे मोदी आणि शाह यांच्या राजकारणाने ठरवलेले आहे. पण तरीही यावेळी राहुल गांधींनी त्यांचे १०० खासदार निवडून आणले. तसेच आमचे काही खासदार, त्यामुळे सरकारला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टाळता आले नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तुम्ही विरोधी पक्षांना घाबरता
“आता महाराष्ट्रा सारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही. याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही सभागृहाचं कामकाज पुढे नेत आहात याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांना घाबरता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणि दिल्लीत अमित शाह यांना लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळायचे नाही असे दिसत आहे. याआधी देखील संख्याबळ कमी असतानाही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नेमलेले आहेत. संसदेत भाजपाची देखील कमी संख्या असताना विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




