Saturday, January 17, 2026
HomeराजकीयSanjay Raut : "एकनाथ शिंदे 'जयचंद' झाले नसते तर…"; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : “एकनाथ शिंदे ‘जयचंद’ झाले नसते तर…”; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई । Mumbai

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या निकालाने गेल्या अडीच दशकांपासून मुंबईवर असलेली शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता उलथवून लावली आहे.

- Advertisement -

भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याने आता मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी महायुतीवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

YouTube video player

राऊत म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल समोर आले असले तरी आमचे मुख्य लक्ष मुंबईवर होते. भाजपने आमच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या हे वास्तव आम्ही स्वीकारतो, परंतु हा विजय त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर मिळालेला नाही. आमच्या पक्षातील ज्या लोकांनी फितुरी केली, त्या ‘जयचंदां’मुळेच भाजपला हा फायदा झाला आहे. जर हे लोक गद्दार ठरले नसते, तर भाजपच्या शंभर पिढ्याही मुंबईच्या महापौरपदावर बसू शकल्या नसत्या, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत पुढे म्हणाले की, भाजपची स्वतःची अशी कोणतीही शक्ती नाही. ते केवळ प्रत्येक राज्यात आणि शहरात पक्ष फोडून ‘जयचंद’ निर्माण करतात आणि त्या जोरावर निवडणुका जिंकतात. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी दावा केला की, जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंतच लोक त्यांना मान देतील; ज्या दिवशी सत्ता जाईल, त्या दिवशी जनता त्यांचा तिरस्कार करेल. मुख्यमंत्र्यांकडे पोलीस, पैसा आणि अमर्याद संसाधने असल्याने त्यांनी या यंत्रणेचा वापर करून निकाल आपल्या बाजूने वळवल्याचा आरोपही त्यांनी केला.

या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मिळालेल्या जागांवरही त्यांनी भाष्य केले. मनसेला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे सांगतानाच, ठाकरे गटाने १० ते १५ जागा अत्यंत कमी फरकाने गमावल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेत आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात काट्याची टक्कर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्याकडे १०५ नगरसेवक आणि सहयोगी लोकांचे बळ असून, आम्ही सत्ताधाऱ्यांना मुंबई विकू देणार नाही. मुंबईच्या हितासाठी आणि कंत्राटदारांचे राज्य संपवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा देत राऊत यांनी आगामी संघर्षाचे संकेत दिले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik MC Election : ठाकरेंच्या सेनेला सोडून शिंदे...

0
नाशिक | Nashik महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी गुरुवार (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. यानंतर शुक्रवार (दि.१६) रोजी मतमोजणी झाली असता यात...