मुंबई । Mumbai
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचा उल्लेख न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. “पंतप्रधान मोदी संसदेत ट्रम्प आणि चीनचं नाव घ्यायला घाबरतात,” अशी टीका त्यांनी बुधवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
संजय राऊत म्हणाले, “मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की शस्त्रसंधीसाठी कोणाचाही दबाव नव्हता. पण त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबवलं. मग पंतप्रधान मोदी ट्रम्पचं नाव का घेत नाहीत? यावर मौन का? या सरकारला ट्रम्पचं नाव घ्यायला हातभर का फा#$?”. चीनचा उल्लेख न केल्यावरूनही राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले. “चीनने पाकिस्तानला मदत केली, शस्त्रास्त्रं पुरवली, नेटवर्क वापरायला दिलं. तरीही मोदी संसदेत चीनचं नाव घेत नाहीत. हे सरकार नेमकं कोणासाठी बोलतं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही सडकून टीका केली. “अमित शाह यांनी काल लोकसभेत भाषण करताना सरदार वल्लभभाई पटेल यांचा 1960 सालचा किस्सा सांगितला. पण सरदार पटेलांचं निधन 1950 मध्ये झालं. मग 1960 सालचा प्रसंग ते कसा सांगू शकतात? अमित शाह खोटं बोलतात, हा त्यांचा इतिहास आहे. त्यांचा खऱ्या इतिहासाशी काहीही संबंध नाही,” असा आरोप राऊतांनी केला. संसदेत झालेल्या चर्चेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “कालच्या चर्चेत सरकारकडे विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नव्हतं.”
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भाषणे काल जोरदार होती, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची खिल्ली उडवली. “मोदींचं भाषण देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर रुदाली होतं,” असा टोलाही राऊतांनी लगावला. संजय राऊत यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून, ऑपरेशन सिंदूरवरून सुरु झालेली राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.




