नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सायंकाळी 728 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर लखलखले होते. अज्ञानाचा अंध:कार संपून ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या ह्रदयात तेवावा, अशी प्रार्थना करण्यात आली. ‘रुप पाहता लोचनी’ अभंगाने आपल्या सुमधुर स्वरातून अभंगवाणी सुरू करून पुनमताई नळकांडे महाराज यांनी भजनसंध्या सादर केली. मंदिरामध्ये पहाटे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाचे विधिवत पूजन देविदास महाराज म्हस्के, शिवाजी होन, विठ्ठलराव सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.
सायंकाळी 6 वाजता पहिला दिवा हा पैस खांबासह माऊलीसमोर पहिला देविदास महाराज म्हस्के, आमदार विठ्ठलराव लंघे, रत्नमाला लंघे, तेजश्री लंघे, करण घुले, संजय सुकाळकर, शिवाजी होन, रामभाऊ जगताप, कैलास जाधव यांच्याहस्ते लावण्यात आला. तद्नंतर प्रतिकृतीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित भाविकांनी दीपप्रज्वलीत करून माऊली बद्दलची असलेली श्रध्दा व भक्तीभाव वृध्दींगत केला. सकाळपासून संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भाविकांनी पैस खांबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
करजगाव येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाच्या 250 महिला, पुरुष सेवेकर्यांनी मंदिर परिसर स्वच्छ करून दीपोत्सवासाठी सेवा दिली. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांनी भैरवी रागात समाधीचा अभंग गायला. पसायदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिपोत्सवास उपस्थित भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासह फोटो काढले.
दीपोत्सवाबरोबरच समर्पण फाउंडेशन यांच्यावतीने ‘भजन संध्या एक चैतन्य सोहळा’ आयोजित करण्यात आला. हा सोहळा आयोजनाचे समर्पण फाउंडेशनचे चौदावे वर्ष आहे. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार रंजना भाऊसाहेब जगताप व दिलीप सजनराज मुथ्या यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.