बेलापूर |वार्ताहर| Belapur
साडेतीनशे वर्षांची अखंडीत परंपरा असलेली त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे जाण्यासाठी निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचे मानकरी मोहन महाराज हिरवे बेलापूरकर यांच्या अधीपत्याखाली हजारो वारक-यांसह विठू नामाचा जयघोष करीत आज गुरुवार दि.19 रोजी परंपरेप्रमाणे बेलापूर बुद्रुक येथील श्री.विठ्ठल मंदिरात मुक्कामी येत आहे. दिंडीच्या स्वागतासाठी बिल्वपुरी नगरी सज्ज झाली आहे.
ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता चिखल तुडवीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून चांदीच्या रथातून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका घेऊन 450 किलोमीटर अंतर पार करण्याचे पंढरी गाठण्याचे लक्ष ठेऊन हजारो स्त्री- पुरुष वारकर्यांसह या दिंडीचे आज भक्तिमय वातावरणात श्रीरामपूर शहरात आगमन व जंगी स्वागत होऊन पालखी बेलापूरला मुक्कामी येत आहे.
परंपरेप्रमाणे पंचक्रोशीतील भजनी मंडळे, भाविक भक्त आणि ग्रामस्थ अंगणात सडा – रांगोळी घालुन पालखीचे वारकर्यांचा पेहराव करुन, डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन सवाद्य हरीनामाच्या जयघोषात स्वागत करतात.विशेष म्हणजे सर्वधर्मीय बांधव या सोहळ्यात सहभागी होऊन सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचा अनोखा संदेश देतात.तसेच ठिकठिकाणी सामाजिक, धार्मिक, सहकारी संस्था आणि दानशूर मंडळीच्या योगदानातून वारकर्यांच्या चहापण, नाष्टा आणि जेवणाची,राहण्याची तसेच वैद्यकीय व्यवस्था करतात.त्यात विविध मान्यवर,कार्यकर्ते आणि संस्थांचा मौलिक सहभाग असतो.
बिल्वपुरीतच दिंडीची मुहूर्तमेढ
350 वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या या दिंडीचा प्रारंभ बेलापूर येथील अध्यात्मिक विभुती भानुदास महाराज हिरवे यांनी सुरु केली होती. त्यामुळे या दिंडीचा मान या घराण्याला आहे. या पिढीत मोहन महाराज बेलापूरकर, सोपानबुवा हिरवे हे दिंडीचे मानकरी आहेत.शिवाय पालखीच्या मुक्कामाची परंपरा हिरवे यांच्या श्री. विठ्ठल मंदिरात आजही कायम आहे.




