Friday, December 13, 2024
Homeशब्दगंधसंत सोयराबाई

संत सोयराबाई

– सुरेखा बोऱ्हाडे

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

- Advertisement -

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग…. हा नितांतसुंदर अभंग लिहिलाय संत सोयराबाईंनी! त्या चोखोबा महाराजांच्या निरक्षर, अठराविश्व दारिद्य्र झेलत, गावकुसाबाहेरचे उपेक्षित जिणे जगणार्‍या पत्नी. चोखोबांचे अभंग गोड आणि श्रेष्ठ आहेत आणि त्याहूनही गोड आहेत ते त्यांच्या पत्नीने, संत सोयराबाई यांनी लिहिलेले अभंग. अर्थात, यामागे प्रेरणा आहे ती चोखोबांचीच! समतेचे तत्त्वज्ञान रुजवणार्‍या वारकरी पंथाने अनेक वास्तव चमत्कार घडवलेत. त्यातला एक अद्भूत चमत्कार म्हणजे संत सोयराबाई. या माऊलीने लिहिलेले अभंग ऐकले किंवा वाचले तरी आपल्याला जीवन धन्य झाल्याचा अनुभव येतो. संत चोखोबांचे कुटुंब मंगळवेढ्याचे. वाट्याला आलेली सर्व उपेक्षा या कुटुंबाने काकणभर अधिकच सहन केली. अशावेळी कुटुंबप्रमुखाला म्हणजेच चोखोबांना जगण्याचे बळ दिले ते पंढरीच्या विठुरायाने आणि पत्नी सोयराबाईने. त्यांनी चोखोबांच्या संसारात कष्ट तर उपसलेच पण चोखोबांच्या विठ्ठलभक्तीतही त्या सोबत राहिल्या.

त्याही पुढे जाऊन त्यांनी चोखोबांप्रमाणेच अभंगरचनाही केली. त्यातून वारकरी पंथाची समतेची शिकवण त्या आवर्जून सांगत राहिली. गावकुसाबाहेर राहणार्‍या चोखोबांच्या कुटुंबाला वारकरी संतांचा सहवास लाभला. साहजिकच पंढरीचा विठुराया त्यांचा सोबती झाला. त्यांची सुखदु:खे जाणून घेणारी प्रेमळ मायमाऊली बनला. संत ज्ञानदेव, नामदेवांच्या संगतीत चोखामेबांना पांडुरंग भक्तीची गोडी लागली आणि या कुटुंबाचे जीवनच बदलून गेले. सोयराबाईंना वाटत होती मूलबाळ नसल्याची खंत. पांडुरंगाने त्यांच्या या भक्ताची इच्छा ओळखली आणि ते याचकाच्या रुपाने दारात आले. त्यांनी सोयराबाईंच्या हातचा दहीभात खाऊन त्यांना आशीर्वाद दिला. देवाच्या आशीर्वादाने या दाम्पत्याला कर्ममेळा नावाचा मुलगा झाला. वारकरी संतांचा चोखोबांच्या घरी राबता होता. अनेकदा चोखोबांच्या घरी स्नेहभोजनाला संतमंडळी जमत. स्वत: बनवलेले जेवण सोयराबाई आग्रह करून वाढत आणि जेवणारे सारे तृप्त होऊन जात. संसारात साथ देणार्‍या सोयराबाई खर्‍या अर्थाने लखलखल्या त्या त्यांच्या रसाळ अभंगवाणीतून. साध्या, सोप्या रसाळ भाषेत त्यांनी जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले. अर्थात, त्यांचे हे सारे तत्त्वज्ञान अनुभवातून आले होते.

‘देहासी विटाळ म्हणती सकळ,

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध’

ज्याकाळात पराकोटीचा जातीभेद पाळला- मानला जात होता, त्याकाळात सोयराबाईंनी अशाप्रकारचे क्रांतिकारक अभंग लिहिले.

‘आमुची केली हीन याती तुज का न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमच्या चित्ता॥’

आम्हाला अस्पृश्य का केलेस, असा सवाल सोयराबाई अभंगातून देवाला विचारतात. अभंगाच्या माध्यमातूनच समाजाशी झगडतात, स्वत:शी वाद घालतात. सोयराबाईंचे अवघे 62 अभंग सध्या उपलब्ध आहेत. पण जे आहेत ते आपल्याला हलवून सोडणारे आहेत. डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. वेशीबाहेरच्या या माऊलीचे हे सारे शब्दवैभव अचाट करणारे आहे.

रसाळ अभंग लिहिणार्‍या संत चोखोबांना काळाच्याही पुढची दृष्टी होती. आपल्या कुटुंबालाही त्यांनी या ज्ञानभक्तीत सहभागी करून घेतले. सोयराबाईंसोबतच चोखोबांची बहीण निर्मळाही सुंदर अभंग लिहू लागली. सोयराबाईंप्रमाणे निर्मळेचीही भाषा रोखठोक आहे. त्यांनी तर थेट आपल्या गुरूला म्हणजेच संत चोखामेळ्यालाही खडसावले. बाळंतपणाच्या काळात सोयराबाईंना एकटे सोडून आल्याबद्दल त्या अभंगातून चोखोबांची कानउघाडणी करताना दिसतात. विठुरायाही या नणंद भावजयींच्या अडीअडचणींना धावतो. सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी श्री विठ्ठलच निर्मळेचे रूप घेऊन चोखोबांच्या घरी येतात. अशा या थोर संत कुटुंबांचे 13वे वंशज अजूनही पंढरपूरला राहतायत. चोखोबा आणि सोयराबाई यांचा वारकरी वारसा चालवताहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या