बीड | Beed
राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी आता कोर्टात सुरू झाली आहे. आता, या प्रकरणातील एक-एक माहिती समोर येऊ लागली आहे. वाल्मिक कराड टोळीच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी आवादा कंपनीशी संबंधित खंडणीच्या प्रकरणाबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने चौकशीदरम्यान पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समजते. सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग नसल्याचे सांगत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची आपबीती सांगितली. सुदर्शन घुले याने, ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला’, अशी कबुली पोलिसांना दिली.
संतोष देशमुखांची हत्या का केली?
संतोष देशमुख यांची निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या या खुनाचे व्हिडीओ, फोटो समोर आल्यानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली. अवादा कंपनीचा पवनऊर्जेचा प्रकल्प हा मस्साजोग गावात येतो. खंडणी मागण्यासाठी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी हे कंपनीच्या कार्यालयात गेले होते. एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली, याची माहिती सुदर्शन घुले याने दिली. सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितले की, आमचा मित्र प्रतिक घुलेचा वाढदिवस होता. त्याच दिवशी सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली. इतकेच नाही तर या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करत आव्हान दिले होते . त्याचा राग मनात होता. त्याशिवाय, संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता. त्यामुळे अपहरण करून हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले याने पोलिसांसमोर दिली. दरम्यान, आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हिडीओ शूट केल्याची कबुली पोलिसांनी दिली. जयराम चाटे यानेही पोलिसांसमोर आरोप मान्य केल्याची माहिती मिळत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा