मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून यावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “संतोष देशमु्ख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) सहभाग आहे म्हणजे आहेच. त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. एका चिल्लर कामासाठी एका चांगल्या लेकराचा खून (Murder) केला या गोष्टीचे खूप वाईट वाटते. एक नंबरच्या आरोपीने हे करायला लावले असून हे इतरांनी कबूल केले आहे. आता यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहीजे”, असे जरांगे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “हे सगळे लोक धनंजय मुंडेंचे असून यात त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा विषय आहे. मात्र सरकारने धनंजय मुंडेंना फुलस्टॉप द्यायचे काम केले ते करायला नको होते. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचे काम केले असून त्यांनी मुंडे यांना डोक्यावर घ्यायला नको होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्याने त्यांच्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई (Action) करावी”, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली.