बीड | Beed
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून येत्या २४ तारखेला या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. वाल्मीक कराड याचे डिस्चार्ज ऍप्लिकेशन आज दाखल करण्यात आले असल्याचे वकील विकास खाडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान याबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टातील युक्तीवाद संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाची काही माहिती दिली आहे. आरोपी वाल्मीक कराडच्या वकीलांनी काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ. वाल्मिक कराड याने डिस्चार्ज अर्ज केला आहे. न्यायालयात संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा व्हिडीओ दिला आहे. आम्ही विनंती केली हा व्हिडिओ बाहेर प्रसारित होऊ नये. यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी माहिती देखील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटले की, न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले आहे. येत्या २४ एप्रिलला त्यावर सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर यावर रितसर सुनावणी होईल. वाल्मीक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खूनात नाही, खंडणी मागितली नाही. मी कसा निर्दोष आहे असा केविलवाणा प्रयत्न केला आहे असे दिसून येते असेही निकम यांनी सांगितले. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, असेही उज्वल निकम यांनी सांगितले आहे.पुढची सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे.
माझ्या विरोधात पुरावा नाही, मला दोष मुक्त करा – कराड
माझ्या विरोधात पुरावा नाही, मला दोष मुक्त करा अशी मागणी वाल्मीक कराड याने केली आहे. अजून चार्ज फ्रेम करण्यात आला नाही. आरोपीने केलेल्या अर्जाचे उत्तर दिले जाईल, अशी माहिती देखील उज्जवल निकम यांनी यावेळी दिली. खुनात आणि खंडणी प्रकरणात माझा संबंध नाही, असे वाल्मिक कराडने म्हटल्याचे देखील निकम यांनी म्हटले आहे. जेव्हा देशमुख यांची हत्या झाली, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा व्हिडिओ कोर्टाकडून सुरक्षित ठेवण्यात आला आहे या २ महत्त्वाच्या घटना सुनावणीत घडल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा