बीड | Beed
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला ३१ जानेवारीपर्यंत एसआयटीची कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी (Police Custody) मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीडच्या न्यायालयात (Beed Court) अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता घुलेला एसआयटीची कोठडी सुनावण्यात आली. डिजिटल पुरावे प्राप्त झाल्याने बीडच्या न्यायालयात युक्तिवाद झाला.
यात सुदर्शन घुलेच्या (Sudarshan Ghule ) मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभागाकडून रिकव्हर करण्यात आला आहे. त्यानूसार पुढे तपास करायचा आहे, असा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला ३१ जानेवारीपर्यंत एसआयटीची कोठडी सुनावली. यावेळी तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील (Kiran Patil) यांनी काही मुद्दे मांडले. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे आणि याच डाटा संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी हवी आहे. यासोबतच एक दुसरा मोबाईल जो सुदर्शन घुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही आणि तेही उघडायचे आहे. त्याचा तपास करायचा आहे.
तसेच यापूर्वी तपास करत असताना जो डिजिटल पुरावा (Digital Evidence) पोलिसांच्या (Police) हाती लागला आणि त्यातून असे सांगण्यात आले की, आरोपीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा पश्चाताप पाहायला मिळाला नाही. जर ही माहिती १४ दिवसांपूर्वीच पोलिसांकडे होती तर मग आता कोणता मोबाईल त्यांना ओपन करायचा आहे असा प्रति प्रश्न आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी विचारला. यासोबतच ज्यादिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याच्या काही तासानंतरच पोलिसांनी जे वाहन ताब्यात घेतले, त्यातच मोबाईल आढळून आले होते. मग इतक्या दिवस हे मोबाईल जर पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर तो तपास आतापर्यंत का झाला नाही असा प्रश्न सुद्धा यावेळी आरोपीच्या वकिलाने विचारला.
सुदर्शन घुले नेमका कोण आहे?
सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी असून तो २७ वर्षांचा आहे. सुदर्शन घुलेचे इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचे बोलले जाते. त्याच्यावर १० वर्षांत १० गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर ४ वर्षांमध्ये ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. याचदरम्यान वाल्मिक कराडचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत घुलेची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामे मिळाली.