वणी | वार्ताहर | Vani
श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर (Saptashrungi Devi) आदिमायेच्या दर्शनासाठी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रशासनाने मंदिर (Temple) बंद होण्याची वेळ वाढविली असून बुधवार दि. २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत मध्यरात्री बारापर्यत दर्शनासाठी खुले ठेवून दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिवाळी (Diwali) कालावधी दरम्यान उत्सव राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असते. दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या व नवरात्रोत्सवातील गर्दीच्या परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येऊ न शकलेला भाविक वर्ग यांची मोठी संख्या असते. हे विचारात घेता अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळण्यासाठी विश्वस्त संस्थेने नियोजन केले आहे.
तसेच आवश्यकतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षारक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालयातील कर्मचारी आदींसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनिक्युलर रोपवे ट्रॉली सुविधादेखील दैनंदिन स्वरूपात पहाटे पाच ते रात्री साडेअकरापर्यंत असेल.
दरम्यान, भाविकांना उपलब्ध दरम्यानच्या कालावधीत भाविकांना (Devotees) दैनंदिन पहाटे पाचपासून रात्री बारापर्यत श्री भगवती दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेऊन गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येऊन मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेतर्फे करण्यात आले आहे.




