राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सत्कर्मांनीच कर्म शुद्ध होऊन दु:ख दूर होऊ शकते. देव दयाळू नाही, तर न्यायी आहे हे विश्वातले कठोर सत्य आहे. भक्तीयोग आणि कर्मयोग वेगळा नाही तर ते दोन्ही एकमेकांना परस्पर पूरक आहेत. भक्तीद्वारे कर्म करण्याचे ज्ञान मिळते. गंगागिरी महाराज निष्काम वारी करत. आज आपण ही परंपरा सांभाळत दिंडी काढली आहे. आपल्या दिंडीत सहभागी होणारा भाविक हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून दिंडी पंढरीत प्रस्थान होताच यंदा भरपूर पाऊस पडू दे, अशी मागणी पांडुरंग चरणी करणार असल्याचे महंत रामगिरी महाराज म्हणाले.
श्रीक्षेत्र सराला बेट गोदावरी धामच्या गंगागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सराला बेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते समाधी पूजन करून प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील शिस्तप्रिय म्हणून ओळख असणार्या दिंडीत फडावरील हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. यावेळी रामगिरी महाराज म्हणाले, वारी भाविकांच्या जीवनातील दुःख दूर करते. सदगुरू गंगागिरी महाराज वारीला जाताना स्वतःच्या कुटियाला आग लावून निष्काम भावनेने वारी करत. आज परंपरागत समाधी पूजन करून दिंडीला चाललो आहोत. आता परतून येईपर्यंत संपूर्ण देशात पाऊस होऊन बळीराजा सुखी होऊ दे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावर्षी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिंडीच्या रथाच्या चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. भाविकांना दररोज पोळीभाजी मिळावी यासाठी पोळ्या बनविण्याचे मशीन घेऊन भाविकांची जेवणाची चांगली सोय संस्थानच्यावतीने करण्यात आली. यावेळी आ. रमेश बोरणारे, साबेरभाई शेख, दिनेश परदेशी, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अविनाश गलांडे, बाबासाहेब जगताप, सचिन वाणी, प्रकाश चव्हाण, पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, भाऊलाल सोमासे, दत्तू खपके, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह दिंडीत सहभागी झालेले 2500 ते 3000 भाविक उपस्थित होते.