Wednesday, July 24, 2024
Homeनंदुरबारदुचाकींची समोरासमोर धडक, तिघे ठार, एक गंभीर

दुचाकींची समोरासमोर धडक, तिघे ठार, एक गंभीर

सारंगखेडा – Sarangkheda – वार्ताहर :

- Advertisement -

सारंगखेडा-अनरद गावादरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष न देता भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने तिघा तरूणांचा मृत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनरद येथील अक्षय रामा पाडवी (वय ३३) हा हिरो होण्डा सीटी १०० (क्रं एम. एच.१८-एयु ६९०६) या दुचाकीने मोतीलाल मंगा भिल (वय ३७) व सातबाई मोतीलाल भिल (दोन्ही रा. होळ ता. नंदुरबार) यांना घेऊन सारंगखेडाकडे जात होते.

तर दोंडाईचाकडून मनोज सैंदाणे (वय २६, रा. मुकटी ता.धुळे) हा पल्सर (क्र. एमएच१८- बीएस ७५१५) वरून शहाद्याकडे येत होता. दोन्ही दुचाकी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष न देता भरधाव वेगाने होत्या.

सारंगखेडा शिवारातील वाघेश्वरी पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अक्षय पाडवी व मोतीलाल भिल यांचा जागीच मृत्यू झाला.

सदरचा अपघात हा काळजाचा थरकाप उडवणारा होता. गंभीर जखमी असलेल्या मनोज सैंदाणेला म्हसावद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यादरम्यान मृत्यू झाला. तर सातबाई भिल यांना डोक्याला व पोटाला दुखापत झाली आहे.

सातबाई या त्यांच्या भावाची तब्येत पाहून पतीसह परत गावी जात होत्या. त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तिघा मयतांचे सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्यासह हवालदार विजय गावित, शानाभाऊ ठाकरे घटनास्थळी पोहचले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. शिरसाठ करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या