Sunday, January 25, 2026
HomeUncategorizedसार्वमतचा ‘उद्योग मंथन’ परिषद उपक्रम कौतूकास्पद

सार्वमतचा ‘उद्योग मंथन’ परिषद उपक्रम कौतूकास्पद

शुभेच्छांच्या वर्षावात रंगला वर्धापनदिन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेली पाच दशके वाचकांना केंद्रस्थानी ठेवून आपला दैदीप्यमान वारसा यशस्वीपणे पुढे घेऊन जाणार्‍या आणि जिल्ह्याचा आरसा असलेल्या दैनिक सार्वमतने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेला ‘उद्योग मंथन’ परिषद हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले. या ‘उद्योग मंथन’ परिषदेमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी नव्या विचारांची देवाणघेवाण झाली. तर जिल्ह्याच्या सामाजिक आणि वैचारिक भविष्यासाठी नव्या दिशेचे मंथन घडून आले. या सोहळ्यात सार्वमतच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते दिमाखात पार पडले.

- Advertisement -

शनिवार दि. 24 जानेवारी रोजी श्रीरामपूर येथील माजी खासदार गोविंदराव आदिक सभागृहात देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, नेवाशाचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, जि. प. माजी सभापती बाबासाहेब दिघे, किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ, श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, भन्साळी उद्योग समूहाचे सीईओ अजिंक्य भन्साळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी, पत्रकार, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player

संपूर्ण सभागृहात सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उत्सवाचे आणि भविष्यातील विकासाच्या अपेक्षांचे वातावरण दिसून येत होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात सार्वमतशी असलेले भावनिक नाते उलगडून दाखवले. ‘उद्योग मंथन’ परिषद प्रेरणा देणारी आहे, हे स्पष्ट करतानाच, नगर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सार्वमत अनिवार्य झाले असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सार्वमतच्या पत्रकारितेची निर्भीड भूमिका अधोरेखित केली. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याची खरी ताकद आजही या वृत्तपत्रात असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वमत आयोजित ‘उद्योग मंथन’ परिषद लाभदायी असल्याचे स्पष्ट करतानाच विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सार्वमतच्या प्रवासाचे आणि सामाजिक भूमिकेचे विशेष कौतुक केले. सार्वमत हे केवळ वृत्तपत्र नसून जिल्ह्याची शान असल्याचे त्यांनी सांगतानाच, उद्योग मंथन परिषद उपक्रम मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सार्वमतच्या पन्नास वर्षांच्या योगदानाचे कौतुक करताना सहकार क्षेत्रातील सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. त्याचवेळी सार्वमतच्या उपक्रमाबद्दलही गौरवोद्गार काढले. भन्साळी उद्योग समूहाचे सीईओ अजिंक्य भन्साळी यांनी सार्वमतच्या निर्भीड लेखणीचे आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचे विशेष कौतुक केले. ‘नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी देणारे तरुण घडले पाहिजेत,’ असा संदेश त्यांनी दिला. त्यासाठी सार्वमतची ‘उद्योग मंथन’ परिषद उपयोगी ठरेल असे सांगितले.

श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी श्रीरामपूरच्या औद्योगिक इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी श्रीरामपूरला पुन्हा उद्योगांची आर्थिक राजधानी बनवण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी सार्वमतची ‘उद्योग मंथन’ परिषद उपक्रम उपयोगी पडेल असे स्पष्ट केले. किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ यांनी शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालण्यावर भर दिला. स्थानिक तरुण उद्योजक तयार करण्यासाठी महाविद्यालये आणि उद्योगांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वमतने गेल्या पन्नास वर्षांत शेतकरी आणि दुग्ध व्यवसायाशी असलेली नाळ जपली, याबद्दल त्यांनी आभार मानले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना विक्रम सारडा यांनी सार्वमतच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडून दाखवला. लेखणीला कोणताही राजकीय रंग लागू न देता लोकहितासाठी काम केल्यामुळेच सार्वमतवर वाचकांचा अढळ विश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. युवा स्टार्टअप्स, स्थानिक नवकल्पना आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी सार्वमत भविष्यातही सक्रिय भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रासमोरील अडचणींवरही खुलेपणाने चर्चा झाली. एमआयडीसी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा अभाव, विजेची अनियमितता, पाण्याचा प्रश्न, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासकीय प्रक्रियांचा संथ वेग या मुद्द्यांवर उपस्थित उद्योजकांनी आपली मते मांडली. उद्योग वाढीसाठी केवळ गुंतवणूकदार पुरेसे नसून, त्यांना विश्वास देणारी व्यवस्था आणि सातत्यपूर्ण धोरणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

परिषदेत उपस्थित तरुण उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधींनीही आपल्या अपेक्षा मांडल्या. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स आणि प्रक्रिया उद्योग या क्षेत्रांमध्ये नगर जिल्ह्यात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय यावरही परिषदेत विशेष भर देण्यात आला. शेतीमाल प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, कापूस, साखर, फळबागा आणि अन्नप्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. स्थानिक कच्चा माल, स्थानिक कौशल्य आणि स्थानिक बाजारपेठ यांचा योग्य वापर केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाचे संचालक तथा सीएओ सुनील ठाकूर, संपादक अनंत पाटील, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, व्यवस्थापक महेश गिते, वृत्तसंपादक बद्रीनारायण वढणे, जाहिरात व्यवस्थापक अश्विन मुथा यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार वृत्तसंपादक अशोक गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व संगिता फासाटे-कट्यारे यांनी केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : टीईटीच्या निकालानंतर शिक्षकांना मोठा दिलासा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील शिक्षक पदोन्नतीचा अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) निकाल जाहीर झाल्यानंतर आणि...