Saturday, July 27, 2024
Homeनगरसार्वमत संवाद : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ‘डट के खडे’ !

सार्वमत संवाद : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ‘डट के खडे’ !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरुण वर्गाकडे खूप काही करण्याची ताकद असून त्यांनी ती ताकद अभ्यास, नोकरी आणि रोजगार निर्मितीसाठी वापरावी. सोशल मीडियावर जास्त वेळ खर्च न करता त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तरुण पिढीला दिला. गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांचे कामच आहे. त्यासाठी पोलीस दल 24 तास ‘डट के खडे’ आहे. सामान्य नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सजगता दाखविली, तर गुन्हेगारांवर वचक वाढवता येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

‘सार्वमत-नगर टाईम्स कार्यालयातील ‘श्रीं’ची आरती अधीक्षक ओला यांच्याहस्ते बुधवारी (दि.20) सायंकाळी झाली. त्यानंतर ‘सार्वमत संवाद’ उपक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आदी उपस्थित होते.

अधीक्षक ओला म्हणाले, सामाजिक शांतता टिकविण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याची भुमिका नागरिकांकडून अपेक्षीत आहे. लोकसंख्या वाढत आहे. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी अधिक सजग असणे अपेक्षीत आहे. एखादा गुन्हा अथवा तेढ निर्माण होत असेल तर तत्काळ पोलिसाशी संपर्क साधला पाहिजे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे नियंत्रण राखताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण प्राप्त परिस्थितीतही पोलीस दल आपले कर्तव्य चोख बजावण्यासाठी तत्पर आहे.

तरुण वर्ग गुन्हेगारीकडे आकृष्ठ होतो, हे वास्तव आहे. शॉर्टकटमुळे तत्कालीन फायद्याचा आभास होत असला तरी भविष्यात त्याचा तोटा होता, याचे भान तरुण पिढीने राखायला हवे. सोशल मीडियावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार दिसून येतात. यामागे एखादा अजेंडा काम करतो, असा निष्कर्ष काढणे पूर्णपणे बरोबर ठरणार नाही. सोशल मीडियावर वादात अडकलेले अनेकजण किशोरवयीन आढळून येतात. अशावेळी समाजातील जाणत्यांनी याबाबत पुढाकार घेऊन सौहार्द टिकविणे अपेक्षीत आहे. पोलिसांकडून स्थितीवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही अधीक्षक ओला यांनी केले.

राजकारण अन् गुन्हेगारी

अलीकडे गुन्हेगारीला राजकीय आश्रय असल्याची चर्चा वाढीस लागली आहे. याबाबत थेट प्रश्नावर ओला यांनी स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, नगर जिल्ह्यात अद्याप असा प्रकार निदर्शनास आलेला नाही. चर्चा तर कोणत्याही विषयावर झडू शकतात. त्यास काही ठोस पुरावा असेल तर काही अर्थ असेल. प्रत्यक्षात पोलीस दल नि:पक्ष आणि निरपेक्ष सेवा बजावत आहे. त्यामुळे अशा चर्चा म्हणजे बिन आगीचा धूर ठरतो, असे अधीक्षक ओला म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या