सातारा | Satara
साताऱ्यातील फलटण येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. डॉक्टरच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे. काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरने मानसिक तणावाला कंटाळून स्वतःचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदनेने वारंवार अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. संपदा मुंडे असे महिला डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे. महिला डॉक्टरने परिसरातील हॉटेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपवले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या हातावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली.
डॉ. मुंडे या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काल रात्री आत्महत्या केली.
सुसाईड नोटमधून डॉ.मुंडे यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुसाईड नोटमध्ये लिहिले की, ‘माझ्या आत्महत्या करण्यामागचे कारण पोलीस निरिक्षक गोपाळ बदने आहेत. त्यांनी माझ्यावर ४ वेळा अत्याचार केला. तर, पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला’, असे महिलेने हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात शोककळा पसरली असून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मोठ्या धक्क्यात आहेत. सहकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. फलटणसह साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





