कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा मोठा उलटफेर बघायला मिळतो आहे. राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे यांना तिकीट देण्यात आले होते. एबी फॉर्म देऊन त्यांनी अर्जही भरला. मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने काँग्रेसची नाचक्की झाली. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? असा प्रश्न करून काँग्रेस नेते सतेज पाटील रागारागाने जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी आधी माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने एका दिवसात उमेदवारी बदलली आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र एकाच घरात दोन दोन पदं नको अशी भूमिका शाहू महाराजांची होती अशी माहिती आहे. त्यामुळेच शाहू महारांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा: Sada Sarvankar: राज ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे आता निवडणूक लढवणारच – सदा सरवणकर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची उमेदवारी कापून काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु पक्षातील वरिष्ठांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाटकर नाराज झाले होते. राजेश लाटकर यांनी या मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केला.
राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर लाटकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी काँग्रेस पक्षावर उमेदवारीवरून आरोप केले. लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही, असे सांगून मधुरीमाराजे यांनी अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितले.
मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शाहू महाराजांनी आदेश दिला. मधुरिमाराजेंनी मालोजीराजेंसमोर माघारी अर्जावर सही करण्याचे आदेश शाहू महाराजांनी दिले. त्यानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडला आणि त्यांना घेऊन बाहेर आले. त्यानंतर मधुरिमाराजेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दम नव्हता तर कशाला उभे राहिलात
या दरम्यान, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सतेज पाटलांचा पारा मात्र चांगलाच चढल्याचे दिसून आले. त्यांनी शाहू महाराजांसमोर नाराजी व्यक्त केली. लढायचे नव्हते तर आधीच सांगायचे होते, मला कशाला तोंडघशी पाडले असे त्यांनी विचारले. माझी फसवणूक केली, हे काही बरोबर झाले नाही असेही ते म्हणाले.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आल्यानंतरही ते भडकले. ‘जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला उभे राहिलात, मी पण माझी ताकद दाखवली असती’ असे सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या जवळच्या लोकांना उद्देशून म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा