Friday, October 18, 2024
Homeदेश विदेश"भिकारी पाठवणं बंद करा, अन्यथा….",' पाकिस्तानला सौदी अरेबियाचा इशारा

“भिकारी पाठवणं बंद करा, अन्यथा….”,’ पाकिस्तानला सौदी अरेबियाचा इशारा

दिल्ली | Delhi

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भिकाऱ्यांसंबंधी पाकिस्तानला (Pakistan) इशारावजा धमकी दिली आहे. धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली देशात येतात आणि नंतर भीक मागतात, असं सांगत सौदीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला त्या नागरिकांना थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, असं न झाल्यास पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे.

- Advertisement -

सौदी अरबच्या हज मंत्रालयाने पाकिस्तानच्या धार्मिक गोष्टींशी संबंधित मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी उमराह व्हिसा घेऊन सौदीत प्रवेश कऱणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्देश दिला आहे. प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने “उमराह कायदा” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ट्रॅव्हल एजन्सींना त्याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी दिली जाईल, जे सहसा व्हिसा आणि इतर कार्ये हाताळतात.

दरम्यान गेल्या महिन्यात सौदीला जाणाऱ्या एका विमानातून ११ कथित भिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं होतं. चौकशीदरम्यान आपला भीक मागण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. अशाच प्रकारे २०२२ मध्ये विमानातील १६ कथित भिकाऱ्यांना विमानातून उतरवून अटक करण्यात आली होती. सौदीमध्ये पाकिटमारी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त असते. दुसरीकडे पाकिस्तानने २००० भिकाऱ्यांचे पासपोर्ट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन ते जगभरात कुठेही जाऊन भीक मागू शकणार नाही. यानुसार सात वर्षांसाठी त्यांचा व्हिसा ब्लॉक असेल.

धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली पाकिस्तानी नागरिक सौदी अरेबियातील विविध शहरात येतात आणि नंतर भीक मागतात, अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सौदी अरेबियाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात पाकिस्तानला इशारावजा धमकी सौदी अरेबियाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या