कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या 191 कोटी निधीतून सुरु असलेले काम धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना येणार्या अडचणींची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी केली.
सावळीविहीर फाटा, कोपरगाव, मनमाड ते सेंधवा मध्यप्रदेशपर्यंत या मार्गाला एनएच 752 जी क्रमांक देण्यात येऊन सिन्नर, शिर्डी, अहिल्यानगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 160 मंजूर करण्यात आलेला आहे. 752 जी च्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या 11 किलोमीटर रस्त्यासाठी आ. काळे यांनी ना.नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल 191 कोटी निधी मिळवून कोपरगावकरांसह या रस्त्याने नियमित ये-जा करणार्या वाहन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार्या या रस्त्याचे मागील वर्षी काम सुरू झाले.
परंतु सुरू असलेले हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणार्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून छोटे अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.याबाबत आ. काळे यांनी संसद भवन दिल्ली येथे ना. गडकरी यांची भेट घेवून धीम्यागतीने रस्त्याचे सुरू असलेले काम व त्यामुळे प्रवास करणार्या नागरिकांना व वाहनधारकांना होणार्या त्रासाची कैफियत त्याच्यापुढे मांडून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्राधिकरणाच्या अधिकार्यांसह बैठक घेवून त्यांना आवश्यक सूचना देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी सहकार्य करावे, अशा आशयाचे लेखी निवेदन दिले. ना. गडकरी यांनी आ. काळे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊन तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले.