नाशिक | प्रतिनिधी Nashik
सार्वजनिक वाचनालयाने गुरुजनांच्या सन्मानाबरोबरच भविष्यात इतर ग्रंथालयांचे दायित्व स्वीकारून त्यांनाही सावानासारखे प्रगत बनवावे, अशी अपेक्षा गुरुवारी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केली.सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ५५ वा ‘शिक्षक गौरव सोहळा’ परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते.
मंत्री सामंत म्हणाले, मराठी भाषामंत्री म्हणून काम करताना विशेष आनंद आहे. काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषा सक्तीवरून राजकारण तापवले गेले. मात्र विरोधक किती खोटे मुद्दे उपस्थित करून राजकरण करतात, हे त्यातून दिसून आले. निवडणूक काळात असे भावनिक मुद्दे उपस्थित करून राजकरण केले जाते. हे त्यातून स्पष्ट झाले. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठा भाषेच्या समृद्धीसाठी सावाना जे जे मागेल ते ते देण्याची आपली तयारी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी योगेश सूर्यवंशी, अविनाश पवार, अनुराधा बस्ते, ज्योती वालझाडे, शामल पाटील, विनित पवार, वैशाली मुळे, शीला गायधनी, संजय डेरले, कुंदा जोशी, अनुराधा नामजोशी, डॉ. नागेश्वर भदाणे, डॉ. अरुणकुमार द्विवेदी, प्रा.सुनीता पाटील, डॉ. प्रमोद हिरे, गजानन अंभोरे, डॉ. गंधार मंडलिक, श्रीकांत गायकवाड, आनंद अत्रे, समीर कुलकर्णी, कैलास लवांड, प्रा. छाया लोखंडे, संध्या केळकर, प्रा.सोमनाथ घुले, प्रा.घनश्याम जाधव, प्रा. संध्या खेडेकर यांचा गौरव करण्यात आला.
सावानाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी स्वागत केले. प्रा. सुनील कुटे, संजय करंजकर, सुरेश गायधनी, सोमनाथ मुठाळ, डॉ. किशोर पवार, राजेंद्र निकम आदींसह सर्व संचालक व समिती सदस्य उपस्थित होते.





