नाशिक | Nashik
राज्यात एकीकडे पेसा भरतीवरुन आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी आपल्यावर आदिवासी असल्याने अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असल्याचा आरोप माध्यमांशी बोलतांना केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाल्या की,”मी आदिवासी असल्याने माझ्यावर अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावलले जात असून सरकार दुजाभाव करत आहे. आदिवासी असल्यामुळे जातीला मध्यस्थी ठेवून जातीची शिकार मी झाली आहे, आदिवासी असल्याने मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासकीय धोरणांनुसार नोकरीसाठी अनेकदा मी अर्ज देऊनही माझ्या अर्जांकडे जाणूबूजून दुर्लक्ष केले जात आहे, माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना मात्र, सहज शासकीय नोकरी देण्यात येत आहे”, असे कविता राऊत यांनी म्हटले.
हे देखील वाचा : संपादकीय : २९ ऑगस्ट २०२४ – नको रे मना लोभ हा अंगिकारू..
पुढे बोलतांना कविता राऊत म्हणाल्या की, “मी आदिवासी असल्याने आणि पाठीशी कुणीही गाॅड फादर नसल्याने १० वर्षांपासून मला राज्य सरकारी नोकरीत डावलले जात असून २०१४ ते २०२४ असे दहा वर्ष मी मंत्रालयात चक्कर मारत आहे.मात्र, अजूनही माझे काम होत नाही. राज्य सरकारी नोकरीसाठी दहा वर्ष का लागले याचे उत्तर सरकारने द्यावे? असा सवाल उपस्थित करत अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपिक धावपटू कविता राऊत यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, कविता राऊतांच्या गंभीर आरोपानंतर आदिवासी लोकप्रतिनिधीनींही सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि माकपचे माजी आमदार जेपी गावीत यांनीही कविता राऊत प्रकरणात सरकार आदिवासी आणि बिगर आदिवासी असा भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाशिक येथील आदिवासी विकास भवन येथे मागील ४ दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे पेसा पदभरतीवरून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला कविता राऊत यांनी भेट दिली असता या आंदोलनातच माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा