अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अज्ञात चोरट्याने एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत, आत प्रवेश करून सुमारे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. सावेडी उपनगरातील गाडेकर चौकातील रेणाविकर कॉलनीत शनिवारी (31 मे) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन बाळासाहेब जगदाळे (वय 30, रा. रेणाविकर कॉलनी, गाडेकर चौक, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी 8:30 वाजता ते आपल्या कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या आई रंजना घरी एकट्याच होत्या. रंजना या कपडे धुण्यासाठी टेरेसवर गेल्यानंतर साधारणतः 9:45 वाजता घरात परतल्या असता त्यांना घरातील दुसर्या मजल्यावरील बेडरूमचे कपाट उघडे व कपडे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले आढळले.
कपाटाची तपासणी केली असता त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने यामध्ये 60 हजार रूपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे गंठण व 10 हजार रूपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत कुटुंबीयांनी घरात शोधाशोध केली, मात्र दागिने सापडले नाहीत. घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.