अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी परिसरात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणार्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत तब्बल 19 लाख 42 हजार 475 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. सावेडी येथील विराज कॉलनीतील अशोककुमार अग्रवाल हे कुटुंबासह जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व सोने, डायमंड, चांदी व रोख रक्कम असा सुमारे 14 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार, रवींद्र पांडे, सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहिद शेख, फुरकान शेख, बिरप्पा करमल, सतिष भवर, रोहीत येमुल, अमृत आढाव, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, भगवान धुळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान हा गुन्हा रमेश कुंभार (वय 49, रा. अमाप रेसिडेन्सी, कशेळी, ठाणे) याने केल्याची माहिती मिळाली. 16 जानेवारी 2026 रोजी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा गुन्हा आशीष शिंदे (रा. बारामती, जि. पुणे, सध्या पसार) याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. संशयित आरोपीकडून 104 ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने, 31 मोती, घरफोडीसाठी वापरलेले कटर असा एकूण 19 लाख 42 हजार 475 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेला रमेश कुंभार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे तब्बल 38 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.




