अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ऐन सणासुदीच्या काळात सावेडी उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील कापड दुकान फोडून 60 हजारांची रोकड तर गुलमोहर रस्त्यावरील घर फोडून देवाच्या चांदीच्या सहा मूर्ती व दोन कॉइन असा सात हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सणासुदीच्या काळात नगर शहरासह उपनगरात चोरटे सक्रिय झाले आहेत. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तोफखाना हद्दीत दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
शुभम रमेश सुडके (वय 26 रा. सुडके मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे बालिकाश्रम रस्त्यावर राज वस्त्र दालन नावाने कापड दुकान आहे. ते त्यांनी सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री 10 वाजता बंद केले होते. दुसर्या दिवशी मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता त्यांनी दुकान उघडले असता त्यांना कपड्यांची उचकापाचक झाल्याचे दिसून आले. काउंटरचे लॉक तुटलेले व खिडकीचे गज कापलेले दिसले. त्यांच्या दुकानातून चोरट्यांनी 60 हजारांची रोकड चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुचेता श्रीराम कुलकर्णी (वय 44 रा. सुस्त्री, चैत्रवन सोसायटी, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे पती मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता घर बंद करून मुलाकडे पुणे येथे गेले होते. जाताना त्यांनी घर व गेट कुलूप लावून बंद केले होते. दुसर्या दिवशी बुधवारी (30 ऑक्टोबर) सकाळी त्यांना सफाई काम करणार्या महिलेने फोन करून घराचे व गेटचे कुलूप उघडे असल्याचे कळविले. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीने नगर गाठून पाहणी केली असता घरातील सामानाची उचकापाचक झाल्याची दिसून आली. देवघरातील देवाच्या चांदीच्या सहा मूर्ती व दोन कॉइन असा सात हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन
दिवाळी सणानिमित्ताने खरेदीसाठी महिला घराबाहेर पडतात. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी जाण्याची शक्यता असते, यामुळे महिलांनी दागिने चोरीला जाणार नाही याची काळजी घ्यावी. दिवाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणार्या नागरिकांनी घर व्यवस्थित लॉक करावे, याची माहिती शेजारी राहणार्यांना किंवा पोलिसांना द्यावी,असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.