अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी उपनगरातील बिशप लॉईड कॉलनी परिसरात एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अनाधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अनिता खिस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रमोद पगारे, सनी पगारे, कपिल पगारे आणि इतर सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिता खिस्ती या मूळच्या पुणे येथील रहिवासी असून, सावेडीतील मॅक केअर हॉस्पिटलसमोर त्यांचा प्लॉट नंबर 380 मध्ये बंगला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हे घर विक्रीसाठी काढले होते. त्यावेळी प्रमोद पगारे याने घर खरेदीसाठी बोलणी केली होती. मात्र किमंतीवरून व्यवहार न ठरल्याने फिर्यादीने घर विकण्यास नकार दिला होता. यावरून संशयित आरोपीने घर विकले नाही तर ताबा टाकला जातो अशी धमकी दिली होती.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फिर्यादी कुटुंबियांसह पुण्यात असताना, संशयित आरोपींनी संधी साधून घराच्या आवारात पत्र्याचे शेड ठोकून ताबा घेतला. 22 जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादीने जाब विचारला असता, संशयित आरोपींनी त्यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




