शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणार्या साईनाथ कवडे याला तपासी यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न होत आहेत. त्यामुळे फसलेल्या हजारो गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम व न्याय मिळण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती सुमारे पाच हजार कोटींची असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
तालुक्यासह राज्याला हादरवून सोडणार्या या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी बाळू बडे यांच्यासह गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून रावतळे कुरुडगाव येथील साईनाथ कवडे याने एसीटेक सोल्युशनच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे पोलिसात दाखल केलेले आहेत. मात्र, सुरू असलेल्या खटल्यामध्ये पोलीस व तपासी यंत्रणेकडून संबंधित आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होत आहे.
जवळपास पाच हजार कोटींचे व्याप्ती असलेल्या या फसवणुकीतून फक्त पाच कोटी रुपये डिसेंबरपर्यंत देण्याची बतावणी करून आरोपी कवडे यास जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याची गुंतवणूकदारांची माहिती आहे. आरोपीच्या गुंतवणूकदारांनी दिलेले कागदपत्र व पावत्या चार्टसीटमध्ये दाखविण्यात आलेल्या नाहीत अशी गुंतवणूकदारांची तक्रार आहे. प्रत्यक्षात दहा हजाराहून अधिक गुंतवणूकदार असताना केवळ 330 जण दोषारोप पत्रासोबत दाखविण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ईडी व आयकर विभागाची भीती दाखवून धमकविण्यात येत आहे.
आरोपीने गुंतवणूकदारांच्या पैशातून घेतलेली संपत्ती व मालमत्ता जप्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे यापूर्वीच केलेली असताना, त्याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही. यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच सीबीआय अशा सक्षम यंत्रणेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे.




