दिल्ली | Delhi
आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी सामने पार पडले असून स्पर्धा सुपर- 4 फेरीपर्यंत पोहोचली आहे. सहा संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील अव्वल 2 संघच या फेरीत प्रवेश करणार होते. अ गटातून आधीच पाकिस्तान आणि भारत संघांनी जागा बनवली आहे. तसेच, बांगलादेशही सुपर-4 फेरीत पोहोचला होता. अशात आता मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) श्रीलंकेने अफगाणिस्तानला 2 धावांनी पराभूत करताच श्रीलंका सुपर- 4 फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनला. यासोबतच सुपर- 4 फेरीचे वेळापत्रकही समोर आले आहे.
सुपर 4 मधील पहिला सामना आज बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात रंगणार आहे. सुपर-4 स्टेजमध्ये एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर गुणतालिकेतील टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. सुपर-4 स्टेजमध्ये 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 2 सप्टेंबर रोजी दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ समोरासमोर आले होते, परंतु पावसामुळे तो सामना रद्द झाला होता. परिणामी दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला होता.
सुपर-4 चे सामने कधी आणि कुठे होणार?
6 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – लाहोर
9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
10 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध भारत – कोलंबो
12 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
14 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
15 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
17 सप्टेंबर – अंतिम सामना – कोलंबो.
दरम्यान पाऊस आणि हवामान पाहता सामन्यांची ठिकाणे बदलून हंबनटोटा (Hambantota) येथे सामने खेळले जातील, असे बोलले जात होते. मात्र, आता याविषयी अंतिम निर्णय समोर आला आहे. सध्या या सामन्यांच्या ठिकाणात कोणताही बदल होणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. यानुसार, आता अंतिम सामन्यासह स्पर्धेतील अखेरचे 6 सामने कोलंबो (Colombo) येथीलच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्येच खेळले जाणार आहेत.