अकोले |प्रतिनिधी| Akole
गणेश स्थापनेच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य, तेल चोरून लेकरांच्या तोंडातील घास हिरावून नेल्याची घटना मवेशी (ता.अकोले) येथे घडली आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मवेशी येथील समर्थ माध्यमिक विद्यालयात गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी रात्री 12 ते सकाळी 8 वाजेपूर्वी अज्ञात चोरट्यांनी रोहित्रावर जाऊन शाळेच्या बाजूला असलेल्या भागाची वीज बंद करून दुचाकीवर येऊन विद्यालयाचे स्वयंपाकगृह हातोडीने कडी-कोयंड्यासह तोडून गॅस टाकी, शेगडी, तेलाच्या 14 पिशव्या, 50 ताटे, 50 चमचे, स्टील पिंप, टोप, तांबे, ग्लास, वाटाणे, मसूरदाळ, तूर, मूग, हरभरा, खिचडीची पात्र, भांडी, भात वाढी, मसाले आदी साहित्य चोरून नेले.
शनिवारी सकाळी विद्यार्थी शाळेत आले असता त्यांना स्वयंपाकगृहाचे दरवाजे उघडे दिसले. तेव्हा आतील वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शिक्षक मच्छिंद्र देशमुख यांना फोन करून सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापिका एम. एस. काळे यांनी राजूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. मुंढे, सांगळे हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्न चोरणार्या व्यक्तींना तातडीने तपास करुन अटक करावी, अशी मागणी माजी सरपंच शरद कोंडार यांनी केली आहे. तर अलिकडे चोरट्यांनी शाळांना टार्गेट करून शालेय साहित्य व पोषण आहार चोरीचा धडाका उठवला आहे. यासाठी शाळांनी सीसीटीव्ही लावून याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनी केले आहे.