अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शैक्षणिक वर्ष 2025-26 ला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासह गणवेश, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे. दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्नाचे नियोजन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व पाय मोजे देण्यात येणार असून यंदापासून याबाबतचे अधिकार पुन्हा शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत. मागील वर्षी राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, अनेक ठिकाणी वेळेवर गणवेशाचे कापड उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस नवीन गणवेशाशिवाय साजरा झाला होता. यंदा मात्र सरकारने हा निर्णय बदलत शाळास्तरावर असणार्या व्यवस्थापन समितींना विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी 6 कोटी 19 लाख रुपयांचे अनुदान 2 जूनला वर्ग केलेले आहे.
तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशासोबत नवीन बुटाची एका जोडसह दोन पायमोजे यासाठी शाळा स्तरावर 3 कोटी 69 लाख रुपयांचे निधी वर्ग करण्यात आलेला आहे. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि नवीन बुटाची जोड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान आठ दिवसापूर्वीच बालभारतीकडून जिल्ह्यासाठी 23 लाख 41 हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात आली असून ती शाळास्तरावर वितरित करण्यात आलेली आहेत.
सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शाळांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पहिल्याच दिवशी पुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंदात जावा, यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजन करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी शनिवारी सुट्टीच्या शिक्षक शाळेत नियोजन करतांना दिसले. यासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात देखील शाळा उत्सावाची तयारी सुरू होती.
59 हजार दाखल पात्र विद्यार्थी
यंदाच्या शैक्षणिक वर्षात नगर जिल्ह्यात पहिलीसह अन्य वर्गातील दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या 59 हजार 527 असून या सर्व विद्यार्थ्यांना नियमितपणे शाळेत दाखल करून घेण्यासाठी कार्यवाही राबण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करणत असल्याची माहिती विस्तार अधिकारी विलास साठे यांनी दिली.
180 अधिकारी देणारी शाळांना भेटी
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यांच्यासह वर्ग एक दर्जाचे 180 अधिकारी हे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्सवादरम्यान शाळा भेटी देणार आहे. या सर्व अधिकार्यांची जिल्हास्तरावरावरून यादी तयार तयार करण्यात आली आहे. यासह तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी हे शाळा भेटीचे गावनिहाय नियोजन करणार आहेत.
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवसात आनंदात जावा, यासाठी तयारी करण्यात आली आहे. गणवेश, पाठ्य पुस्तकांसह विद्यार्थ्यांना नवीन बुट आणि पायमोजे देण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांनी स्थानिक लोकप्रतिनिधीसह शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासत घेवून शाळा प्रवेश उत्सव राबवावा.
– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.




