राहाता । वार्ताहर
शहरातील १४ चारी परिसरातील कार्ले वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री एक मादी बिबट्या जेरबंद झाला. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरातील या परिसरातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. मात्र, अद्यापही या भागात अन्य बिबटे आणि त्यांची पिल्ले मुक्त संचार करत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
काही दिवसांपूर्वीच याच परिसरातून एका नर बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याने प्रगतिशील शेतकरी सतीश भोंगळे आणि गणेश कारखान्याचे माजी चेअरमन नारायण कार्ले यांच्यासह ग्रामस्थांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली होती. अनेक दिवस पिंजरा लावूनही बिबट्या त्यात अडकत नव्हता. अखेर गुरुवारी चंद्रशेखर कार्ले व त्यांच्या सहकाऱ्यांनी युक्ती लढवत पिंजऱ्याची जागा बदलली. पिंजऱ्यात भक्ष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या आणि तो उसाच्या पाचटाने झाकून ठेवण्यात आला.
गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेली अंदाजे सहा ते सात महिने वयाची मादी बिबट्या कोंबड्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात पिंजऱ्यात अडकली. शुक्रवारी सकाळी ही बातमी समजताच कार्ले वस्तीवरील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या मादी बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवले आहे.
एकाच महिन्यात दोन बिबटे पकडले गेले असले तरी, १४ चारी परिसरातील संकट अद्याप टळलेले नाही. स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या भागात अजूनही एक मोठा नर बिबट्या आणि दोन पिल्ले वावरत आहेत. हे बिबटे मानवी वस्तीजवळ येत असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत उर्वरित बिबटे आणि पिल्ले जेरबंद होत नाहीत, तोपर्यंत वनविभागाने या भागात गस्त वाढवावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.





