Friday, November 22, 2024
Homeनगरजप्त गहू, तांदूळाचा कवडीमोल भावात लिलाव

जप्त गहू, तांदूळाचा कवडीमोल भावात लिलाव

श्रीगोंद्यातील महसूल विभागावर प्रश्नचिन्हे || नेमके गौडबंगाल कळेना || टिळक भोस यांच्यासह चौघांवर खंडणीचा गुन्हा

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या अंतर्गत वेगवेगळ्या कारवाईत जप्त असलेला गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव करण्यात आला. मात्र, यावेळी खुल्या बाजारात किमान 30 ते 40 रुपये किलो दर असलेले गहू आणि तांदूळ अवघ्या 14 रुपये किलो दराने लिलावात एका एजन्सीला देण्यात आले. यामुळे जप्त धान्य मालाचे इतक्या कमी किमतीमध्ये लिलावाचे गौडबंगाल नेमके कसे झाले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा महसूल विभागाच्या पुरवठा शाखेकडून दर माहिना स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना धान्य वितरण होत असते. हे धान्य लाभार्थ्यांना न जाता काही वेळेस खुल्या बाजारात विक्रीसाठी जाते. अशा धान्यावर पोलीस, महसूलची कारवाई होत असते.श्रीगोंदा पोलिसांनी जप्त केलेला गहू आणि तांदूळ लिलाव जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशानुसार ठेवण्यात आला. हा लिलाव करताना संबंधित लिलावात बोली लावणार्‍यांकडून प्रतिक्विंटल 1 हजार 400 रुपये गहू आणि तांदूळ यासाठी बोली लावली. ही सर्वोच्च बोली असल्याने एक ट्रेडिंग कंपनीला हा साठा देण्याचे ठरले.

तसे चलन भरून घेतले, पण नंतर हा लिलाव घेणार्‍याकडून याच प्रकरणात एका संघटनेचे पदाधिकारी आणि धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष यावर गुन्हा दाखल करण्यात आला. खुल्या बाजारात धान्यांचे बाजार अधिक असताना जप्त असलेला धान्य साठा कमी किमतीत लिलाव केला, याला हरकत घेण्यात आली. याप्रकरणी टिळक भोस यांनी हा लिलाव कमी किमतीत झाला असल्याने फेरलिलाव करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात अर्ज दिल्यानंतर त्याच्यासह अन्य चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मार्केटमधून जप्त धान्यांचे दर घेऊनच लिलाव
जप्त गहू आणि तांदूळ नमुने अगोदर कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखवून सर्वोच्च दर 1 हजार 400 आणि कमीत कमी दर 1 हजार 200 ठरवले होते. त्यानुसार सर्वाधिक बोली 1 हजार 400 आली त्याला लिलाव देण्यात आले. यात गव्हाचे 1 लाख 8 हजार 752 आणि तांदूळ 3 लाख 60 हजार 472 रुपये चलन भरून घेऊनच लिलाव दिले, असे नायब तहसीलदार बन यांनी सांगितले.

मॅनेज केल्याची चर्चा
जप्त गहू आणि तांदूळ लिलाव करताना टेंडर प्रक्रियाच मॅनेज असल्याने बोली मालाचे नमुने दाखवून भाव ठरवले ते टेंडर झाले. त्यानंतर काय करायचे याची यंत्रणा आणि चर्चा फिसकटली आणि होणार्‍या नफ्यात वाटेकरी नको असल्याने मॅनेज टेंडरची चर्चा झाली.

टिळक भोस यांच्यासह चौघांवर खंडणीचा गुन्हा

श्रीगोंदा तालुक्यातील जप्त धान्य लिलाव प्रकरण

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

पुरवठा विभागाच्या ताब्यात जप्त असलेल्या गहू आणि तांदूळ लिलाव घेऊन देखील संबंधित धान्य साठा घेऊन जाण्यास आडकाठी करत 1 लाख 50 हजार रुपये दिल्याशिवाय हे धान्य घेऊन जाऊ नये, अन्यथा तक्रार होईल असे म्हणत खंडणी आणि धमकावल्याने अजित संजय लाटे (धंदा-व्यापार रा. कोथुळ) याच्या फिर्यादीवरून टिळक भोस याच्यासह धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष सतीश हिरडे आणि अन्य तिघांच्या विरोधात खंडणीसह अन्य गुन्हे श्रीगोंदा पोलिसांत दाखल करण्यात आले आहेत.

श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या गहू आणि तांदुळाची जाहीर लिलाव प्रक्रिया पार पडली. त्या लिलावाच्या ठिकाणी अतुल कोठारी (रा. पारगाव सुद्रीक), सुनील मुनोत (रा. श्रीगोंदा), तात्याराम झराड (रा. बेलवंडी कोठार), सतीश हिरडे (रा. म्हातारपिंप्री) व जे. बा. टेड्रींग कंपनी हजर होते. यात गहू, तांदूळ धान्यासाठी सर्वोच्च बोली लावल्याने लाटे यांना लिलाव दिला. मात्र हिरडे माझ्याकडे आले व मला म्हणाले, मी तालुक्याचा रेशनिंग संघटनेचा अध्यक्ष आहे. तू मला पैसे दिले तरच तांदूळ घेवून जाऊ देईल नाहीतर तु येथून माल कसा घेवून जातो ते पाहतो.

तसेच तू मला 90 हजार रुपये दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर मढेवडगाव येथे भेटल्यानंतर त्यांनी मला हॉटेलवर घेवून जात धमकी देत खंडणी मागितली. त्यानंतर शासकीय गोदामातून माल घेवून जात असताना व्यापारी अतुल कोठारी, सुनील मुनोत, तात्याराम झराड यांनी तू गाडी कशी भरतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भोस यांनी गोदाम कार्यालयात येऊन दीड लाखांची मागणी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या