मुंबई | Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत युवासेना आणि भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय झाला आहे.
युवासेना विरुध्द भाजपच्या अभाविप अशी निवडणुक पहायला मिळाली. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीतही युवासेनेचं वर्चस्व पाहायला मिळाले होते. या निवडणुकीतही युवासेनेने सिनेटवरील आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, युवासेनेने सिनेट निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले की, पुन्हा एकदा १० पैकी १०…ज्यांनी मतदान केले, त्याचे मनापासून आभार…आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल शिवसेना आणि युवासेनेकडून धन्यवाद…मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही फक्त पुनरावृत्ती केली नसून आमची कामगिरी देखील सुधारली आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच १०० टक्के स्ट्राइक रेट…इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो, असे आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी दिले आहे.
कोणते उमेदवार निवडणून आले?
युवासेनेच्या सर्व विजयी उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी प्रमाणपत्र दिले. यामध्ये ५ जागांसाठी खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले. तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज ( DT/NT) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मयुर पांचाळ आणि महिला प्रवर्गातून स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले.
युवासेनेने ज्याप्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर युवासेनेकडून आज मातोश्रीवर दुपारी बारा वाजता एक मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच सर्व विजयी उमेदवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतील.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा