Friday, November 15, 2024
Homeराजकीयखडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबई –

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाचे

- Advertisement -

अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बुधवारी याबाबत बैठक झाली, विशेष म्हणजे नाशिक दौर्‍यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने मुंबई गाठत या बैठकीला हजेरी लावली. खडसेंच्या पक्ष प्रवेशासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. प्रवेशसंबंधित नेत्याच्या प्रवेशाबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांचे म्हणणे काय आहे, स्थानिक नेत्यांची भूमिका काय? याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजतेे.

गेल्या काही दिवसांत एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला असल्याचे आरोप केले आहेत.आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी आपण वाचा फोडणार.मी स्वस्थ बसणार राजकारणी नाही.लवकरच अनेक रहस्यांचा खुलासा होईल,असा सूचक इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे हीच ती वेळ म्हणत एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजप नेत्यांच्या अडचणी वाढवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील म्हणाले…..

कोल्हापूर – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असून देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील नेत्यांवर ते टीका करत आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचंही सांगितलं आहे. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल.

जयंत पाटील यांनीही केलं भाष्य

शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली का ? असं विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.

ज्यांनी चर्चा सुरू केली त्यांनाच विचारा – खडसे

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावरुन सुरु असलेल्या चर्चेसंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं , ‘हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा.’

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या