नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीला जाणाऱ्या ‘राजधानी एक्स्प्रेस’ रेल्वेच्या धडकेत सात हत्तींचा मृत्यू झाला आहे, तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या धडकेचा इम्पॅक्ट इतका होता की राजधानीचे पाच डब्बे रुळावरुन खाली उतरले. हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला मध्यरात्री २ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.
नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे (एनआफआर) प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे हत्तींच्या कळपाला धडकल्याने रेल्वे इंजिन आणि पाच डब्बे रुळावरुन खाली उतरले. हा अपघात शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीनंतर रात्री २ वाजून १७ मिनिटांनी झाला. जामुनामुख-कंपुर सेक्शनमधील चंगजुराई सेक्शनमध्ये हा अपघात झाला. या ट्रेनमध्ये तुलनेने कमी गर्दी असल्याने कोणत्याही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही.
नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे आणि परिस्थितीचा आढावा घेत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कळपात आठ ते दहा हत्ती होते. त्यामधील सात हत्तीचा मृत्यू झालाय, तर एक जखमी आहे. त्यांनी सांगितले की, बाधित जमुनामुख-कानपूर सेक्शनमधून जाणाऱ्या गाड्या दुसऱ्या लाईनवर वळवण्यात आल्या आहेत. सध्या लाईनवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिझोरममधील सैरंग (ऐझवालजवळ) ते आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) यांना जोडते.
रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी या अपघाताबाबत अधिक माहिती दिली आहे. शर्मा म्हणाले, या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेच्या घसरलेल्या डब्यांमधील प्रवाशांना इतर डब्यांमध्ये जागा देण्यात आली. तसेच सकाळी सहा वाजता ही रेल्वे गुवाहाटीकडे रवाना झाली आहे. गुवाहाटीत या रेल्वेला आणखी डबे जोडले जातील. गुवाहाटी रेल्वे स्थानकाकडून प्रवाशांच्या सोईसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातानंतर काही कालावधीसाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. काही रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




