पाहता-पाहता पावसाळा (Rainy Season) सुरू होऊन तीन महिने लोटले आहेत, पण या कालावधीत जो काही पाऊस झाला तो अतिशय अपुरा आहे. सप्टेंबरमध्ये पावसाच्या पुनरागमनाचे भाकित हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने भाकित खरे ठरण्याची शक्यता वाटत आहे. पुनरागमन करणार्या पावसाने बरसण्यात सातत्य ठेवले तरच शेतीवाडीला थोडाफार दिलासा मिळू शकेल. अन्यथा महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेच्या नशिबी दुष्काळाचा (Drought) दाह अटळ आहे…
यंदाचा मोसमी पाऊस सर्वसाधारण असेल, 96 टक्के पाऊस पडेल, असे भाकित हवामान विभागाने एप्रिल महिन्यात वर्तवले होते. दुष्काळाची शक्यता 22 टक्के असल्याचेही म्हटले होते. प्रत्यक्षात काय झाले? हवामान विभागाचे भाकित पावसाने जवळपास फोल ठरवले आहे. जूनपाठोपाठ जुलै गेला. ऑगस्ट तर कोरडाच गेला. आता एकच महिना उरला आहे. तरीसुद्धा पाऊस सरासरी गाठू शकलेला नाही. पावसाची तूट मोठी आहे. पावसाचा लहरीपणा पाहता महिनाभरात ही तूट भरून निघण्याची शक्यता धूसर आहे. महाराष्ट्रासोबत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, केरळ इत्यादी राज्यांवरसुद्धा दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसणार आहे.
गेली तीन-चार वर्षे सलग महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस बरसत राहिला. राज्याला जलसमृद्धी देत राहिला. यावर्षी मात्र पाऊसमान बदलले आहे. ‘एल निनो’चा प्रभाव राहणार असून त्याचा परिणाम यंदाच्या मोसमी पावसावर होईल, अशी शक्यता वर्तवली गेली होती. ती शक्यता खरी ठरली आहे. नुकत्याच सरलेल्या ऑगस्ट महिन्यात राज्यात पाऊस आलाच नाही. पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले आहेत, पण या कालावधीत जो काही पाऊस झाला तो अतिशय अपुरा आहे. बहुतेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पेरणी झालेली कोवळी पिके सुकली आहेत. करपणारी पिके पाहून नाउमेद झालेले काही शेतकरी त्या पिकांत ट्रॅक्टर चालवून ती पिके मातीआड करत आहेत. अनेक ठिकाणी जनावरांच्या चार्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. धरणे, तलाव, बंधारे न भरल्याने पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनाचा प्रश्न उभा ठाकण्याची शक्यता आहे.
‘धरणांचा जिल्हा’ असलेल्या नाशिक जिल्ह्याकडे अपवाद वगळता पावसाने पाठ फिरवली आहे. सुरुवातीला राज्याच्या इतर भागात बर्यापैकी पाऊस झाला, पण नाशिक जिल्हा उपेक्षित राहिला. दमदार पावसाची वाट पाहणार्या जिल्ह्यावर पावसाने अद्यापही कृपादृष्टी दाखवलेली नाही. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. गेली चार वर्षे समाधानकारक पावसात सातत्य दिसत होते. आता ते विस्कळीत झाले आहे. साधारणत: जुलै-ऑगस्टमध्ये नाशिक जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होते. ऑगस्टअखेर जिल्ह्यातील बहुतेक धरणे तुडुंब भरून ओसंडत असतात.
नदी-नाल्यांना पूर येतात. शेत-शिवारे चिंब भिजतात. आज मात्र काळजी वाटणारे आणि वाढवणारे चित्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. राज्यातील डबल इंजिनच्या महायुती सरकारला आणखी एक गट नव्याने जोडला गेल्यावर ट्रिपल इंजिन सरकार आधीपेक्षा जास्त वेगाने धावायला हवे. प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसते. राज्यात दुष्काळाच्या भयावह सावल्या दाटत आहेत. विकासकामांचा वेग प्रचंड वाढल्याचे सरकारचे मंत्री सांगत असले तरी दुष्काळासारख्या प्रश्नाचे गांभीर्य सत्ताधार्यांना अजूनही आलेले दिसत नाही. शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. जनतेचे प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत.
सिन्नर तालुक्यातील 41 गावांत पुरेशा पावसाअभावी अद्याप खरीप पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. ढेकूळही फुटलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता सांगणारी ही परिस्थिती आहे. जिल्ह्यात तीन महिन्यांत मिळून 380 मि.मी. म्हणजे सरासरीच्या केवळ 50 टक्क्यांपर्यंत पाऊस पडला. राज्याच्या 329 महसुली मंडळांमध्ये तब्बल 23 दिवस पावसाचा खंड पडला आहे. राज्य सरकार वाजत-गाजत लाभ योजना घेऊन लोकांच्या दारी जात आहे. गर्दीही जमवली जात आहे, पण त्यासोबतच शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली पाहिजे. शेतांच्या बांधावर जाणे आज जास्त आवश्यक आहे.
पावसाळ्याचे दिवस असताना आजघडीला राज्यातील दोन हजार गावे पाणीटंचाईशी दोन हात करत आहेत. 373 गावे व 1,422 वाड्या तहानलेल्या आहेत. 400 टँकरने पाणी पुरवून त्या गावांतील जनतेची तहान भागवावी लागत आहे. पुढील काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढत जाण्याची शक्यता जास्त आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा नाशिक आणि पुणे या दोन जिल्ह्यांना सोसाव्या लागत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 1,200 गावे आणि नाशिक विभागातील 168 गावे पाणीटंचाईची झळ सोसत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार गेल्यावर्षी याच काळात राज्यात फक्त 14 गावे आणि वाड्या टँकरग्रस्त होत्या. त्या संख्येशी तुलना करता आता पाणीटंचाईची तीव्रता किती झपाट्याने वाढली ते लक्षात यावे.
122 वर्षांत ऑगस्ट महिन्यातील सर्वात कमी पाऊस चालू वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात नोंदवला गेला आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर अनेक राज्यांत आतापर्यंत अपुरा पाऊस झाला आहे. गेल्या महिन्यात दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इत्यादी काही राज्यांना जोरदार पावसाचा फटका बसला. तेथील जनतेला पूरस्थितीचा सामना करावा लागला. याउलट स्थिती महाराष्ट्रासह काही राज्यांची झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने अनेक राज्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. केंद्र सरकारने 18 सप्टेंबरपासून संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन अचानक बोलावले आहे. तथापि अधिवेशनात कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार ते अजून तरी गुलदस्त्यात आहे.
देशाची सद्यस्थिती, दुष्काळी परिस्थिती, शेतकर्यांचे प्रश्न, मणिपूरमधील संघर्ष, चीनची घुसखोरी इत्यादी ज्वलंत विषयांवरसुद्धा अधिवेशनात प्राधान्याने चर्चा होण्याची गरज आहे. कारण हे सगळे विषय भारतीय जनतेशी संबंधित आणि त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांवर दुष्काळ छाया दाटली आहे. सप्टेंबरमध्ये पावसाच्या पुनरागमनाचे भाकित हवामान विभागाने वर्तवल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने भाकित खरे ठरण्याची शक्यता वाटत आहे. पुनरागमन करणार्या पावसाने बरसण्यात सातत्य ठेवले तरच शेतीवाडीला थोडाफार दिलासा मिळू शकेल. जलाशयांची पातळी वाढू शकेल, अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भाळी दुष्काळाचा दाह अटळ आहे.