Tuesday, December 3, 2024
Homeशब्दगंधशब्दगंध : माणसाने माणसाशी माणसासम वागणे....

शब्दगंध : माणसाने माणसाशी माणसासम वागणे….

नाशिक | डॉ वैशाली बालाजीवाले

आयुष्याच्या मस्तीत धुंद होतो. मस्त चाललं होतं सगळं काही. मुबलक होतं. भौतिक सुखाच्या सगळ्या कक्षा रुंदावून ठेवल्या होत्या. ते मिळवण्यासाठी खूप सार्‍या वाटा उपलब्ध होत्या, त्या आम्ही शोधल्यादेखील होत्या. धावत होतो, पण मजेत होतो. हे होतं मार्च 2020 पूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतर संपूर्ण जगासगट माझंही आयुष्य स्तब्ध झालं. करोना नामक एका जाणिवेने सुन्न झालो. अवघं जग थांबलं आणि आयुष्याची गतीही संथ झाली…

- Advertisement -

या संथगतीत आपल्याच आयुष्याच्या अनेक गोष्टी, अनेक कंगोरे दिसायला लागले. जे अगदी हवंहवसं, आवश्यक होतं ते नाही मिळालं म्हणून फारसा काही फरक पडत नव्हता. घरात होतो, कुटुंबियांसमवेत होतो, वेगळ्या संवादाची कौशल्यं शिकत होतो. घरातीलच माणसांबरोबर जगणं शिकत होतो. वेळ मिळाला होता अवतीभोवती नव्यानं बघण्याचा, ते पाहायला शिकत होतो. आमच्यापैकी काहीजण घरून काम करू लागली. सहज शक्य होतं ते, हे जाणवलं आणि घरून काम करतानादेखील कार्यक्षमता तशीच ठेवता येते हेदेखील कळलं. आपली घरातली मंडळी, त्यांचे रोल्स, त्यांचे कार्यभाग, त्यांच्या जबाबदार्‍या कशा सांभाळतात हे उघड्या डोळ्यांनी बघायला मिळालं.

आणि मग लक्ष गेलं ते स्वतःकडं. काय चाललं होतं माझं आतापर्यंत? करिअरची घोडदौड, त्यातील स्पर्धा, वर्कप्लेस पॉलिटिक्स, तिथली चढाओढ, काम करताना, आयुष्य जगताना येणार्‍या नानाविध अडचणी आणि त्यातून कितीतरी वेळा येणारं एक वैफल्य. सोडून द्यावी ही नोकरी, हा व्यवसाय, हा संसार आणि कुठेतरी लांब, निर्मनुष्य ठिकाणी, त्या हिमालयाच्या कुशीत जाऊन राहावं असं हजार वेळा तरी मनात आलं असेल. पण आता असा विचार आला की आपण आतापर्यंत जे जे जगलो ते किती क्षणिक होतं. त्यामध्ये कुठे परिपक्वता नव्हती, हे मात्र नक्की जाणवलं.

आज मी जे होतो तो म्हणजे माझ्याच लोकांपासून दूर झालेला मी. सभोवती मित्रमंडळी नाहीत आणि शेजारी असूनही शेजारपण नाही. आप्तस्वकीय, मित्रमंडळींना दुरावलेला मी. रस्त्याने रोज दिसणारे चेहरे नाहीत, दुकानांमध्ये सहज शिरता येणं नाही की भाजीवाल्याशी गप्पा मारता येणं नाही. दूधवाला दारात येऊन जगाच्या खबरबात देणं संपलं आणि सलूनमध्ये न जाण्याने गल्लीतलं गॉसिप संपलं.

ही सगळी माणसं माझ्या आयुष्याचा केवढा मोठा भाग आहेत हे मला तेव्हा जाणवलं. मी ठरवलं तर मला माझ्या अनेक संवेदना, जाणिवा अनुभवता येऊ शकतात हेदेखील मला कळलं.

जसजसा बाहेरचा प्रादुर्भाव वाढत होता, तशी मलाही भीती वाटू शकते, माझीही चिंता वाढू शकते, ती माझ्या डोक्यात कशी घर करू शकते, हे माझ्या लक्षात आलं आणि या चिंतेवर, या भीतीवर जर काबू करायचं असेल तर मलाच स्वतःला खंबीर बनवलं पाहिजे हे लक्षात आलं. अर्थात, यावेळेला आधार मिळाला तो टेक्नॉलॉजीचा.

टेक्नॉलॉजीमार्फत खूप काही बघितलं, खूप काही वाचलं, खूप काही जाणून घेतलं. पडणार्‍या प्रश्नांची उत्तरं शोधू लागलो. ती खरी-खोटी आहेत का नाही यासाठी पुस्तकं, वर्तमानपत्रांवर वाचली. या सगळ्यातून कुठेतरी आपल्या स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती.

हा शोध घेता घेता अनेक जण गांगरले होते, परिस्थितीने दबले होते. भविष्याची आर्थिक चिंता वाढत होती पण घरात दोन वेळचं खायला मिळत होतं, डोक्यावर छप्पर होतं आणि एक सुरक्षिततेची भावना होती. ती किती महत्त्वाची असू शकते हे याच परिस्थितीने जाणवून दिलं. जगलो तर लढूदेखील आणि हा काळ नक्की सरेल हे स्वतःला समजवत एक एक दिवस निघत राहिला. जड होता, परीक्षा बघणारा होता, पण काळ सरत होता.

अति झालं की बांध फुटतो म्हणतात आणि तसंच काहीसं चित्र नंतरच्या काळात बघायला मिळालं. संयमाचा बांध सुटला. माझ्याच गरजांकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकलेला मी परत थोडासा बेभान झाला. मात्र काळाने परत धडा शिकवला.

मार्चमध्ये दुसरी लाट आली आणि यावेळेस मात्र सगळंच सैरभैर झालं. स्वतःकडे लक्ष द्यायला हवं, आपलं शरीर निरोगी राखायला हवं हे जाणवलं.

या प्रादुर्भावात घरच्या घरं, कुटुंबाच्या कुटुंब होरपळली गेली. कोणाचे अगदी जवळचे तर कोणाचे नातेवाईक, मित्र दगावले. दुःख प्रत्येकाला झालं आणि याकाळात खूप काही शिकायला मिळालं.

शिस्त पाळायची म्हणजे नक्की काय करायचं हे उमगलं. इतके दिवस शिस्तीने वागा जे सांगण्यात येत होतं त्याकडे दुर्लक्ष झालं आणि तेच अंगाशी आलं होतं. त्यामुळे शिस्त फक्त वागण्यात नको, ती आचारणात आणि विचारात यायला पाहिजे हे माझ्यासारख्याला पटलं आणि मग लक्ष गेलं ते निरोगी आयुष्य जगण्याकडे. गरजा कमी झाल्या होत्या, थोडक्या पैशांमध्ये कसे भागवायचे, आपातकाळासाठी पैसा वाचवला गेला पाहिजे, हेही वर्षभरात कळलं होतं. पण मात्र आता कुठेतरी एक गांभीर्यदेखील आलं होतं. घरच्या घरी कसरत, योगा याकडे माझ्यासारख्यांची मनं वळाली. ऑनलाईन व्यायाम, एक्सरसाईज, मेडिटेशन यांसारख्या गोष्टी शिकण्यास सुरुवात झाली. त्यात काय गमक आहे, हे उमजलं आणि हळूहळू मन एकंदरीत सर्वांगीण सुखद स्थिती मिळवण्याकडे वळालं. ‘माईंडफुलनेस’ आणि ‘वेलबिंग’ हे महत्त्वाचं ठरलं. याच्यात आहार, विहार आणि विचार या तिन्हींचा समावेश झाला. साधं सपक अन्न आजकालच्या फास्ट फूडपेक्षा कसं उपयोगी ठरू शकतं, कसं शरीराला मदत करू शकतं हे मला उमगलं आणि त्यामुळे घरी केलेल्या अन्नावर मी भर देऊ लागलो. शरीराला जसं सुदृढ ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले तसेच मनालाही.

मनाची सुदृढता, सकारात्मक विचाराने येते आणि म्हणून माझ्यासारखे सगळेजण सकारात्मक विचारांचा शोध घेऊ लागले. भोवतालची परिस्थिती नकारात्मक असतानाही काय चांगलं होतंय, कोण चांगलं बोलतंय, कोण चांगलं वागतंय, एकमेकांना मदत कशी करता येईल याकडे माझं लक्ष जायला लागलं.

मनुष्य स्वभाव हा चंचल असतो. त्याच्यामुळे जिथे वळवू, तेथे वळतो. तसं माझंही मन एकंदरीत या सकारात्मकतेकडे वळायला लागलं. आपल्या संस्कृतीत अध्यात्म हे खूप सकारात्मक वृत्तीकडे नेतं आणि म्हणून माझ्यासारखे खूप सारे अध्यात्माकडेही वळले. सकाळचे श्लोक, संध्याकाळचा परवाचा, देवाची आराधना आणि ‘देवा, आता तूच मार्ग दाखव’ या भूमिकेत जाऊ लागले. माझ्या परिस्थितीबाबतची कृतज्ञ भावना वाढू लागली अन् आकाशात उडणारा मी कुठेतरी जमीन शोधू लागलो.

माणसाने हरवलेला नम्रपणा शिकू लागलो. अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत बघून मलाही हातभार लावावासा वाटू लागला. दुरावलेल्या मित्रमंडळींना फोन करून त्यांची चौकशी करू लागलो. हे सगळे करताना मनात कुठेतरी मीही आधार शोधत होतोच. भीतीदायक विचारांचं घोडं थांबवायचं असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे हे उमगलं आणि म्हणून चांगलं वाचन हाती येऊ लागलं. या सर्व गोष्टी लहानपणापासून ऐकलेल्या होत्या किंबहुना त्या कराव्यात म्हणून घरातल्या थोरामोठ्यांनी अनेक वेळा समजावून सांगितल्या होत्या, पण बदलत्या काळाच्या ओघात असलेला मी, मला गगनभरारी घेण्याची घाई झाली होती. तो विचार आणि वेग किती निष्फळ होता हे आता दिसू लागलं होतं. आता माझ्याकडे मी वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो आहे. या मार्गाकडे परतयाला मात्र एक प्रलय परिस्थिती कारणीभूत ठरली होती.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याचे एक प्रकारचे सामाजिक वर्तन असते. हे वर्तन बहुतांशवेळा एका दिशेने चाललेले असते आणि ती दिशा समाज ठरवत असतो. एक वागला की त्यासारखा दुसरा वागू लागतो. पण आज मात्र जाणीवपूर्वक मला स्वतःला बदलावं लागलं. ते मी वेळेतच बदललं असतं तर कदाचित माझं मन आतापर्यंत सैरभैर झालं नसतं आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावर निश्चित झाला नसता.

जसा मी बदलत गेलो तशी तशी कृतज्ञतेची भावनाही माझ्या मनात वाढू लागली. सकारात्मक विचारांनी स्थैर्य दिलं. आशावादाने कठीण परिस्थितीवरही मात करण्याची ताकद दिली. एकमेकांना मदत करण्याची माझी क्षमता वाढू लागली आणि आपल्याच आप्तस्वकियांना, मित्रमंडळींना एकमेकांचा आधार किती महत्त्वाचा आहे, हे कळू लागलं.

आजची परिस्थिती बदलेल, नक्कीच. मी मात्र देवाला हीच प्रार्थना करतो की माझ्यात झालेले, आचार, विचार आणि विहारातले बदल कायम राहो. माझ्यातील नम्रपणा टिकून राहो. माझ्यातली कृतज्ञतेची भावना कायम राहो आणि माझे सगळ्यांबरोबरचे प्रेमसंबंध जुळलेले राहो. चांगला काळ आला तरी परमेश्वरा, माझे पाय हे जमिनीवर रोवलेले असूदेत. भरारी घेईल मी परत, उंच आकाशी उडी घेईनही, पण ती भरारी कर्तृत्वाची असेल, आकाशाला गवसणी ही विचारांच्या समृद्धीची असेल आणि आज मिळालेली नजर ही तितकीच स्वच्छ असेल, मन पारदर्शक असेल, अशी ताकद मला दे. जी प्रार्थना मी नेहमी ऐकत आलो आहे ती प्रार्थना सफल होऊ दे, हीच प्रार्थना करतो-

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,

सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,

तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे

एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे

अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले

पाऊले चालो पुढे.. जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

(आभार – कवी समीर सामंत)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या