Friday, May 3, 2024
Homeब्लॉगकॉंग्रेसला संजीवनी, विरोधकांना बळ!

कॉंग्रेसला संजीवनी, विरोधकांना बळ!

गुजरातमधील बम्पर विजयाची पुनरावृत्ती कर्नाटकात करण्याचे मनसुबे भाजप नेत्यांनी रचले होते, पण ते फोल ठरले. सत्ताधार्‍यांचा कोणताही नारा जनतेला भुलवू शकला नाही. कर्नाटकातील शानदार विजयाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. गुजरातमधील दारुण पराभवाची भरपाई कर्नाटकात झाली, असेही म्हणता येईल. काँग्रेस फक्त हरण्यासाठी निवडणुका लढते, असा भ्रम प्रतिस्पर्ध्यांकडून निर्माण केला जात होता. तो कर्नाटक निकालाने दूर झाला आहे…

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी कर्नाटक विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. ‘किंग मेकर’ होऊन भाजप आणि काँग्रेसला आपल्यापुढे झुकवण्याच्या इराद्याने जेडीएस पक्षही लढला. मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज त्याच दिवशी सायंकाळी जाहीर झाले. अनेक वाहिन्यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस दाखवली. त्रिशंकू विधानसभेचे संकेत देताना जेडीएस ‘किंगमेकर’होईल, असेही सूचित केले. काही मोजक्या संस्थांच्या अंदाजांत मात्र कर्नाटकात काँग्रेसच सत्तेवर येणार, असे भाकित वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यावर सुरुवातीचे कल येऊ लागले.

- Advertisement -

त्यात काँग्रेसने आघाडी मिळवली होती. दुपारनंतर चित्र स्पष्ट झाले. प्रतिष्ठेची निवडणूक काँग्रेसने जिंकून भाजपला धोबीपछाड दिला. 224 पैकी 135 जागा काँग्रेसने जिंकल्या. भाजपला 66 जागांवर समाधान मानावे लागले. 34 वर्षानंतर कर्नाटकी जनतेने प्रथमच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत दिल्याचा इतिहास घडवला. ‘ऑपरेशन लोटस’मधून सत्तेत आलेल्या भाजपला मतदारांनी झिडकारले. कर्नाटकातील पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भविष्यात देशातील मतदारांचा कल कसा राहणार? ते कर्नाटकच्या निकालावरून समजणे योग्य नाही, अशी मतमतांतरे व्यक्त होत आहेत. तथापि बदलाच्या वार्‍याची दिशा मात्र या निकालाने दाखवली आहे, असे म्हणता येईल.

कर्नाटकात 38 जागा घटवून कर्नाटकी जनतेने भाजपला विरोधी बाकावर बसवले आहे. काँग्रेसला सन्मानाने सत्ता बहाल केली आहे. कर्नाटक निवडणूक रणसंग्रामात शीर्षस्थ नेत्यांसह केंद्रीय मंत्री तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी भली मोठी फौज उतरवण्यात आली होती. या फौजेचे नेतृत्व पंतप्रधान मोदी आणि ‘भाजपचे चाणक्य’ म्हटले जाणारे केंद्रीय गृहमंत्री शहा करीत होते. ही सज्जता पाहून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी असाच फौजफाटा बंगभूमीत उतरवण्यात आला होता, पण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपला दारुण पराभवाची धूळ चारली होती.

बंगालसारखा करिष्मा काँग्रेसने कर्नाटकात करून दाखवला. दक्षिण भारत आता ‘भाजपमुक्त’ प्रदेश झाला आहे. तरीसुद्धा पराभव मान्य न करता ‘फार नुकसान झाले नाही, जागा कमी झाल्या तरी आमच्या मतांची टक्केवारी कायम आहे’ असे सांगून काही भाजप नेते सोयीचे विश्लेषण करीत आहेत. 2018च्या निवडणुकीत भाजपला 36.35 तर काँग्रेसला 38.14 टक्के मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसला 2 टक्के मते जास्त मिळूनसुद्धा फायदा मात्र भाजपला झाला होता. भाजपने 104 जागा पटकावल्या होत्या. काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. आताच्या निवडणुकीत चित्र पालटले आहे. भाजपची 36 टक्के मते कायम राहिली. त्यात नगण्य घट झाली. मात्र, नगण्य घटीनेसुद्धा भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या. याउलट काँग्रेसला 43 टक्के (42.9) मते मिळाली आहेत. काँग्रेसची मते 5.76 टक्क्यांनी वाढली आहेत. वाढीव टक्क्यांमुळे काँग्रेसला घसघशीत 55 जागांचा फायदा झाला.

‘डबल इंजिन सरकार’ सत्तेच्या रुळावरून घसरले आहे. जनतेला काय कळते? अशा भ्रमात राहून जनतेला गृहीत धरणार्‍या राजकीय पक्षांच्या भ्रमाचा भोपळा कर्नाटकच्या जनतेने फोडला आहे. किमान 40 जागा जिंकून भाजप आणि काँग्रेससोबत सत्तेची सौदेबाजी करता येईल, अशी जेडीएसच्या नेत्यांना खात्री होती. जेडीएसचा तो मनसुबाही मतदारांनी उधळला. कानडी जनतेने परिस्थितीचा सारासार विचार केला. राजकीय नेत्यांच्या बेफाम वक्तव्यांना भीक न घालता सद्सद्विवेकाने मतदान केले. त्यातूनच पारदर्शी जनादेश आला आहे.

गुजरात आणि पंजाबातील काँग्रेसच्या पराभवाला त्या पक्षातील नेत्यांचे मतभेद आणि गटबाजी कारणीभूत ठरली. याउलट चित्र कर्नाटकात दिसले. मतभेद विसरून सर्व नेते पक्षासाठी एकत्र आले व लढले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला कर्नाटक सत्तेचे दार खुले झाले. पुढील काळात होणार्‍या निवडणुकांसाठी कर्नाटकातील रणनीती काँग्रेसला उपयोगी पडू शकेल. मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेशात सत्ता मिळवली. हिमाचलनंतर अवघ्या सहा महिन्यांत आलेली गृहराज्य कर्नाटकची प्रतिष्ठेची निवडणूकही काँग्रेसने खरगेंच्या नेतृत्वात जिंकली. निवडणुका जिंकून देणारा अध्यक्ष काँग्रेसला मिळाला, असे आता म्हटले जाईल.

गुजरातमधील बम्पर विजयाची पुनरावृत्ती कर्नाटकात करण्याचे मनसुबे भाजप नेत्यांनी रचले होते, पण ते फोल ठरले. सत्ताधार्‍यांचा कोणताही नारा जनतेला भुलवू शकला नाही. कर्नाटकातील शानदार विजयाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. गुजरातमधील दारुण पराभवाची भरपाई कर्नाटकात झाली, असेही म्हणता येईल. काँग्रेस फक्त हरण्यासाठी निवडणुका लढते, असा भ्रम प्रतिस्पर्ध्यांकडून निर्माण केला जात होता. तो कर्नाटक निकालाने दूर झाला आहे.

एकदिलाने लढल्यास यश खेचून आणता येते, हा आत्मविश्वास काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांत निर्माण करणारा विजय म्हणून या यशाकडे पाहता येईल. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने विरोधी पक्षांचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे. काँग्रेसच्या सहभागाशिवाय भाजपपुढे समर्थ आव्हान विरोधकांना उभे करता येणार नाही, हा संदेश या निकालाने विरोधकांना दिला आहे. पंतप्रधान मोदी आतापर्यंत भाजपला हमखास विजय मिळवून देणारे ‘हुकमी एक्का’ ठरले आहेत. कर्नाटकात मात्र त्यांची जादू चालली नाही. लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करण्याची स्वप्ने पाहणार्‍या भाजपची चिंता त्यामुळे बरीच वाढवली असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या