धुळे – Dhule – प्रतिनिधी :
राज्यभर गाजलेल्या गुड्डया हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी शाम गोयरचा पहाटे हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्युचे कारण समजु शकलेले नाही, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी देशदूतशी बोलतांना दिली.
शहरातील पारोळा रोडवर पिस्तुलने गोळी झाडत व तलवारीने हल्ला करत कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्या याचा खुन करण्यात आला. ही घटना दि. 18 जुलै 2017 रोजी पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास घडली होती. घटनेची क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ही घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती.
घटनेनंतर पोलिसांनी सर्व फरार आरोपींना अटक केली. मात्र एकमेव शाम गोयहा हा संशयीत आरोपी फरारच होता. दरम्यान महिनाभरापुर्वी तो अचानक धुळ्यात अवतरला. त्याला कोरोना संशयीत म्हणून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी देखील तो हवा असल्याने पोलिसांनी तेथे खडा पहाराच ठेवला होता.
महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. मात्र नेमका त्याचा कोणत्या आजाराने मृत्यू झाला हे समजु शकलेले नाही. म्युमोनिया, हदयविकार, कोरोना अथवा इतर आजाराने मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. शाम गोयर हा गुड्या हत्याकांडातील संशयीत आरोपी असता तरी तोमहापालिकेत कामगार नेता म्हणून ओळखला जायचा.