सोनई |वार्ताहर| Sonai
श्रीक्षेत्र शिंगणापूर येथे ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याप्रकरणी देवस्थानच्या दोघा कर्मचार्यांना सायबर शाखेने अटक केली. त्यानंतर अनेक संशयीतांचे धाबे दणाणले असून अनेकजण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले असल्याचे समजते. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनावट प्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून सायबर शाखेने तपास सुरू केला. याप्रकरणी देवस्थानचे कर्मचारी, पुरोहितांसह अधिकार्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
या तपासात देवस्थानचे लिपिक संजय तुळशीराम पवार व सीसीटीव्ही विभाग प्रमुख सचिन अशोक शेटे या दोघांना गुरुवारी रात्री सायबर शाखेने अटक केली त्यांना नेवासा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासाला गती मिळाल्याने संशयितांचे धाबे दणाणले आहे तर काही संशयित परिसरात दिसेनासे झाले असून कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेल्याचे समजते.
शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा अभिषेक व तेल अर्पण संदर्भात खोटा मजकूर ऑनलाईन पसरवला व भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्या प्रकरणी पाच अॅप धारक व साथीदारावर अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बनावट अॅपधारक व त्यांचे साथीदारांनी ऑनलाईन दर्शन पूजा, अभिषेक, तेल चढावा बुकिंग करीता शनैश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी घेतली नसून भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्या होत्या.




