शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur
शनि अमावस्या निमित्त शनिशिंगणापूर येथील स्वयंभू शनीमूर्तीचे दोन लाखाच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त दानशूर व्यक्तींकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शनि महाराजांची पहाटेची आरती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, सौरभ बोरा, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. रात्री बारा वाजता झिम्बाबे येथील जयेश शहा, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, दुपारी बारा वाजताची आरती अनिल वराट इंदोर, तर संध्याकाळची आरती उद्योगपती गोविंद अग्रवाल ओरिसा यांच्या हस्ते करण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव विभागाचे पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी शंभर पोलीसासह चोख बंदोबस्त ठेवला होता. गर्दीचा अंदाज घेऊन पोलीस कर्मचार्यांनी बॅरिकेड लावण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवार व शनिवार अशी दोन दिवस अमावस्या असल्याने अपेक्षित गर्दी झाली नसल्याने व्यावसायिकांचा माल पडून राहिला.
सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र व देवस्थानचे यांचे वैद्यकीय पथक भाविकांच्या आरोग्य सुविधेकडे लक्ष देत होते. देवस्थानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. तसेच भाविकांना अभिषेकासाठी स्वतंत्र मंडप व्यवस्था केली. सिरसा (हरियाणा), दिल्ली व शिंगणापूर परिसरातील भाविकांनी दोन दिवस भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली तसेच देवस्थानने वाहनतळाची सोय केली होती.
सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवली होती.पहाटे खा.श्रीकांत शिंदे यांनी शनीदर्शन घेतले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, मनोज हारदे, संदिप शिंदे, पोलीस पाटील सयाराम बानकर, ज्ञानेश्वर पेचे, संदीप बानकर, हरिभाऊ जगताप, शिरेगावचे सरपंच किरण जाधव, आदी उपस्थित होते.
प्रशासक प्रवीण गेडाम यांनी घेतला देवस्थानचा ताबा
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शुक्रवार दि. 19 रोजी तातडीने रात्री उशिरा शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार ताब्यात घेतला. शुक्रवार रात्री व शनिवारी दिवसभर प्रवीण गेडाम यांनी देवस्थानच्या सर्व अधिकारी व विभाग प्रमुख यांना कामकाजा बाबत सूचना केल्या. आमदार विठ्ठल लंघे यांनी शनिदेवाला अभिषेक करून दर्शन घेतले.




