सोनई |वार्ताहर| Sonai
राज्य सरकारने शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करुन केलेल्या प्रशासक नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाला दिलासा मिळाला आहे. याचिकेवर 10 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
राज्य शासनाने शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची देवस्थानच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर प्रशासकांनी दैनंदिन कारभार पाहण्यासाठी 11 जणांची कार्यकारी समितीची स्थापना केली. या निर्णयाविरोधात शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होऊन न्यायालयाने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
खंडपीठाने प्रतिवादी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, न्यासाचे प्रशासक तथा अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. प्रतिवादींना 4 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे म्हणणे दाखल करावयाचे आहे. याचिकेवर 10 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.





