सोनई | Sonai
शनी शिंगणापूर मंदिर हे देशात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असून लाखों भाविकांची श्रद्धा व भावना यात अडकली आहे. नेवासा तालुक्याचे राजकारण हे नेहमी शनी देवस्थान भोवती फिरत आहे. या गावातील तालुक्याच्या राजकारणाचा राजकीय फेरा कधी संपणार? याची चर्चा शनी शिंगणापूर परिसरातील ग्रामस्थ करत आहे.
धर्मदाय संस्थेकडे शनी शिंगणापूर ट्रस्टची स्थापना 1963 ला झाली. स्वर्गीय बाबुराव बानकर यांच्यासह शेटे व दरंदले कुटुंबातील 5 लोक पहिले विश्वस्त झाले. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या संस्थेची काळजी घेतली. त्यानंतर काही वर्षानंतर विकास कामांसाठी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी गावांतील दोन गटांना एकत्र घेत विकास कामाची मुर्हतमेढ रोवली. पुढे गुलशनकुमार यांनी ‘शनी महिमा’ चित्रपट काढला व तो संपूर्ण भारतात प्रदर्शित केला त्यामुळे हे गाव जगाच्या नकाशावर गेले. यात स्वर्गीय भाऊसाहेब शेटे, स्वर्गीय भिमानाना दरंदले यांच्यासह अनेक ज्येष्ठ लोकांचे मोठे योगदान आहे.
ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. ज्यांनी कुणी भ्रष्टाचार केला आहे त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. देवस्थानचे काही कर्मचारी आपल्या घरचेच हे देवस्थान असल्यासारखे वागत असतात. देशातून आलेल्या भाविकांसोबत त्यांचे बोलणे सुद्धा चांगले नसते. काही कर्मचारी खुलेआमपणे भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. त्यात कमिशन एजंट तर भाविकांना साडेसाती झाली आहे. रस्त्यावर जाऊन एखाद्या गुंडासारखे भाविकांच्या गाड्यांना आडवे उभे राहतात. अगदी पोलीस ठाण्यासमोर त्यांचा अड्डा झाला आहे. हे कमिशन एजंट अनेक पक्षांच्या स्थानिक नेत्यांसोबत जोडले आहे. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळतोच. वरती काही पोलिसांसोबत ‘मधुर’ संबंध असल्याने त्यांना कुणी अडवत नाही. ‘मनी व मसल पॉवर’ असल्याने शनी शिंगणापूर गावात अनेकदा मोठमोठे वाद झाले आहेत.
एकेकाळी हे गाव तर कट्ट्यांचे केंद्रबिंदू झाले होते. शनी शिंगणापूर गावाची मोठी बदनामी देशात होत असून गावातील ज्येष्ठ लोक हळहळ व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षात भाविकांची संख्या खूप वाढली आहे. शनी जयंती, अमावस्या या दिवशी लाखो भाविक दर्शन घेतात. पंढरपूर येथे कोट्यावधींचा मठ, सुमारे 50 कोटींचा पानसनाला प्रकल्प, गोशाळा, लहान मुलांना वारकरी शिक्षण अशी विविध विकासकामे येथे या काही वर्षात झाली आहेत. यापुढेही भाविकांसाठी अशी दर्जेदार कामे घडावी व भ्रष्टाचार करणार्या लोकांना शिक्षा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोषींना शिक्षा, भाविकांना सुविधा या एकमेव गोष्टीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शनी महाराज सद्बुद्धी देतील, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
युवा नेत्यांचा लढा
अॅप घोटाळा उजेडात आल्यावर भाजपचे ऋषिकेश शेटे, काँग्रेस पक्षाचे संभाजी माळवदे, वैभव शेटे, शुभम बंब यांच्यासह अनेकांनी पोलिसांकडे निवेदन दिली. दोषीवर कारवाईची मागणी केली. संभाजी माळवदे दोन वेळेस उपोषणाला बसले. प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत या युवा नेत्यांनी यात लढा दिला.
रस्ते, बेरोजगारीवर तारांकीत प्रश्न कधी ?
देवस्थान मध्ये सुमारे 2400 मुलांची भरती केल्याने माजी आमदारांवर जाहीर आरोप केले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे तर विद्यमान आमदारांनी शासन स्तरावर मोठे राजकीय वजन वापरत देवस्थानचा गैरव्यवहार तारांकित प्रश्न करून बाहेर आणला, त्याचे कौतूक होत असले तरी त्यांनी तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांचे प्रश्न, वीज, पीकविमा, बेरोजगारी तसेच तालुक्यातील शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी पुन्हा एकदा तारांकित प्रश्न उपस्थित करून तालुक्यातील हे प्रश्न मार्गी लावावे, अशी मोठी चर्चा तालुक्यात होत आहे.
पद्मश्री पोपटराव पवारांना अध्यक्ष करावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले की, देवस्थान बरखास्त केले जाईल. 2018 च्या नवीन कायद्यानुसार राज्यातील नागरिक विश्वस्त होऊ शकतो. आजपर्यंत जुन्या घटनेनुसार फक्त शनी शिंगणापूर मधील रहिवाशीच विश्वस्त होत होता. नवीन विश्वस्त मंडळात चांगल्या लोकांना स्थान द्यावे व पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासारख्यांकडे अध्यक्षपद दिले जावे अशी सामान्य लोकांची भावना निर्माण झाली आहे.




