मुंबई (प्रतिनिधी)
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शनि शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी विधानसभेत केली. जे कर्मचारी अथवा विश्वस्त लोकसेवकच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
भाजपचे आमदार विठ्ठल लंघे यांनी काल विधानसभेत शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना मांडली होती. या सुचनेवरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी शनि शिंगणापूर देवस्थानात तब्बल २ हजार ४७४ बोगस कर्मचारी दाखवून देवस्थानचे पैसे पगाराच्या स्वरूपात आपल्याच कार्यकर्त्यांच्या खात्यात वळते केल्याचे सांगत देवस्थानच्या गैरकारभाराचा सारा हिशोबच विधानसभेत उघड केला. देवाच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विश्वस्त मंडळाच्या व्यवहारांची चौकशी केलेल्या सरकारी समितीच्या अहवालातील धक्कादायक माहिती सभागृहाला दिली. डमी पवर भक्तांकडून देणग्या घेतल्या जायच्या आणि त्यातील कोट्यवधी रुपये हे विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांमध्ये परस्पर जमा व्हायचे. त्यामुळे या प्रकाराची सायबर सेलच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी केली जाईल. या मंदिरात मी गेली अनेक वर्षे जातो. २५८ कर्मचारी होते तेव्हा मंदिराचा कारभार नीट चालायचा. विश्वस्त मंडळाने तब्बल २ हजार ४४७ कर्मचाऱ्यांची भरती केली, चौकशीमध्ये प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी अस्तित्वातच नसल्याचे आढळले, अशी धक्कादायक माहिती फडणवीस यांनी दिली.
याप्रकरणी विधी आणि न्याय विभागाला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलिसांना बाहेरील पथक पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आलेल्या तक्रारींनुसार विशेष ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी धर्मादाय विभागाच्या एका अधिकाऱ्याने क्लिनचिट दिली होती. या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी केली जाईल. आधीचा अनुभव लक्षात घेता पोलिसांच्या बाहेरील पथकाला चौकशी करण्यास सांगितले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
तत्पूर्वी विठ्ठल लंघे यांनी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या भ्रष्टाचाराची कार्यपद्धती सांगितली. या ट्रस्टच्या विश्वस्तांनी डमी अॅप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या. असे तीनचार अॅप होते आणि प्रत्येक अॅप वर तीन-चार लाख भक्तांनी पैसे पाठविले, असे लंघे म्हणाले. या शिवाय बोगस भरतीवरही त्यांनी प्रकाश टाकला. एकूण घोटाळा १०० कोटींचा असल्याचे ते म्हणाले. भाजपचे सुरेश धस यांनी हा घोटाळा ५०० कोटींचा असून ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा-दहा कोटी रुपयांच्या जमिनी घेत आहेत, असा गंभीर आरोप केला.
शिर्डीच्या धर्तीवर येथेही शासकीय समिती स्थापणार
पंढरपूरमधील श्री विठ्ठल देवस्थान आणि शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर शनि शिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी शासकीय समिती स्थापन करण्यात येईल. घोटाळ्यांप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यातील घोटाळेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जातील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.




