अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यभर चर्चेत असलेला आणि विधिमंडळाच्या मागील अधिवेशनातही गाजलेला शनिशिंगणापूर देवस्थानच्या अॅप घोटाळ्याप्रकरणी अखेर सायबर पोलिसांनी कारवाई करत देवस्थानच्या दोघा कर्मचार्यांना गुरूवारी (4 डिसेंबर) रात्री अटक केली. त्यांना आज (शुक्रवार) न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सचिन शेटे, संजय पवार अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अॅप घोटाळ्याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो तपासासाठी येथील सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले या गुन्ह्याचा तपास करत आहेत. देवस्थानच्या अधिकृत परवानगीतील तीन अॅप व्यतिरिक्त आणखी चार बेकायदेशीर अॅप आढळून आले आहेत. या माध्यमातून जमा झालेल्या देणग्यांपैकी काही निधी दोघा कर्मचार्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवला गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी देवस्थान विश्वस्त, कर्मचारी व पुजार्यांची चौकशी केली आहे. संशयास्पद व्यवहार झालेली बँक खाती तपासली असून अॅपच्या माध्यमातून पैशांची आवक-जावक कशी झाली, कोणाकडे निधी पोहोचला याची माहिती घेतली आहे.
दरम्यान सचिन शेटे व संजय पवार या दोघांकडे सायबर पोलिसांनी चौकशी केली व त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत काय समोर येणार यावर गुन्ह्याचा तपास अवलंबून असणार आहे. उशिरा का होईना पण सायबर पोलिसांनी या गुन्ह्यात दोघांना अटक केली असल्याने पुढील तपासाला गती येणार आहे.




